‘माझ्या आईची शेवटची आठवण परत द्या…’, दुचाकी चोरीनंतर व्यक्तीचे पोस्टरद्वारे भावनिक आवाहन

पुण्यात दसऱ्याच्या दिवशी एका व्यक्तीची ॲक्टिव्हा दुचाकी चोरीला गेली. यामुळे दु:खी झालेल्या या व्यक्तीने एक भावनिक पोस्टर बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याचा पोस्टरसोबतचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दसऱ्याच्या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून अभय चौगुले नावाच्या व्यक्तीची ॲक्टिव्हा स्कूटी चोरीला गेली होती. आजूबाजूच्या परिसरात कसून शोधाशोध करूनही त्याची दुचाकी काही सापडली नाही. त्यामुळे
अभयने पोलिसांत दुचाकी हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली. मात्र तरीही त्याची गाडी न सापडल्याने अभयने पोस्टर बनवण्याचे ठरवले.

अभयने गाडी हरवल्याचे पोस्टर बनवून तो पुण्यातील रसत्यावर उभा राहिला. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे त्या पोस्टने लक्ष वेधले. माझी गाडी चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, माझ्या आईने खूप कष्ट करून माझ्यासाठी 12 वीत ही गाडी घेतली होती. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. PLZ परत करा “Black Activa MH14B26036 या गाडीच्या नंबरसह त्याने स्वत:चा मोबाईल नंबरही दिला आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अनेक सोशल मीडिया वापरकर्तांनी अभयचा हा फोटो शेअर करत चोराने अभयची गाडी परत करण्याचे आवाहन केले आहे.