
गुजरातमध्ये एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. सूरतमध्ये अज्ञात कारणातून एका 200 किलो वजनाच्या तरुणाने हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि व्यक्तीला वाचवण्यात यश आले. मात्र 200 किलोच्या तरुणाला चौथ्या मजल्यावरून खाली उतरवताना 11 जवानांना चांगलाच घाम फुटला.
सूरत येथील अमरोली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कल्पेश भट या 200 किलो वजनाच्या तरुणाने दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. त्याने असे का केले याबाबत अद्याप कळू शकले नाही. मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. कुटुंबीयांच्या आवाजाने शेजारी मदतीसाठी धावले. शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबीयांनी कल्पेशला रुग्णालयात नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र कल्पेशचे वजन पाहता त्याला चौथ्या मजल्यावरून खाली उतरवण्याचे त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले.
कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कल्पेशला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र खूप प्रयत्नाअंती पोलिसांनीही हार मानली. अखेर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्नीशमन दलाच्या जवानांनी कापडाच्या झोळीत तरुणाला टाकले. त्यानंतर 7 अग्नीशमन दलाचे जवान आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून अखेर तरुणाला चौथ्या मजल्यावरून खाली आणले. 200 किलो वजनाच्या तरुणाला चौथ्या मजल्यावरून खाली आणताना अग्नीशमनचे जवान आणि पोलिसांना मात्र चांगलाच घाम फुटला.