हडपसरमध्ये खोक्यात आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

तरुणाचा खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले. मृतदेह शुक्रवारी सायंकाळी हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ कागदी खोक्यात सापडला होता. तरुणाचे हात-पाय बांधून खोक्याला चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले.

निजामुद्दीन पटेल (वय – 30, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. इम्रान यासीन पटेल (वय – 24, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. आसिफ मेहबुब पटेल (वय – 29, रा. रॉयल मॅरेज हॉलसमोर, थेऊर फाटा, गाढवे मळा, लोणी काळभोर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. खोके उघडल्याानंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे हात-पाय बांधण्यात आले होते. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.

बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती घेण्यात आली. कोंढवा परिसरातून इम्रान पटेल बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पटेलच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली. इम्रानच्या खुनापूर्वी आदल्या दिवशी सायंकाळी निजामुद्दीनने त्याला बोलावून घेतले होते. आर्थिक वादातून निजामुद्दीनने इम्रानच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. या घटनेत इम्रानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निजामुद्दीनने त्याचे हात-पाय दोरीने बांधून खोक्यात मृतदेह ठेवला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांना सांगितले. हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके टाकून तो पसार झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, समीर पांडुळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ यांनी ही कामगिरी केली.