महामुंबई सेझसाठी संपादित केलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी माणगावमधील मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कार्यक्रमाचे कारण पुढे करून ही सुनावणी रद्द केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर पुढची सुनावणी थेट 13 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रायगडातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून तारीख पे तारीख नको आता निर्णय घ्या असे खडेबोल सुनावले आहेत. यासाठी 15 ऑक्टोबर रोजी शेकडो शेतकरी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन करणार आहेत.
महामुंबई सेझसाठी पेण, पनवेल आणि उरणमधील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र पंधरा वर्षांनंतर येथे एकही प्रकल्प न आल्याने या जमिनी परत करण्यात यासाठी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहेत. याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे संतप्त शेतकरी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असताना या ना त्या कारणाने वारंवार ही सुनावणी पुढे ढकलली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या महिन्यातही 11 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच महामुंबई सेझ कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी सुनावणी अथवा निर्णय घेण्याचा कोणताच अधिकार रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नसल्याची याचिका दाखल केली होती. याबाबतची सुनावणी न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे 9 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र ही सुनावणी देखील अचानक रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.