मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्लीत इमर्जन्सी लॅण्डिंग

मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे.

सध्या हे विमान विमानतळावर उभे असून विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉलप्रमाणे तपास केला जात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

एअर इंडियाच्या विमानाने रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास मुंबईतून उड्डाण घेतले होते. हे विमान न्यूयॉर्कच्या जेएफके एअरपोर्टच्या दिशेने निघाले होते. मात्र विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने हे विमान तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले.

याआधी 22 ऑगस्ट रोजीही अशी घटना घडली होती. एअर इंडियाचे एआय 657 हे विमान मुंबईहून तिरुवनंतपूरम येथे पोहोचले होते. हे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विमानातील 135 प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.