मिंधे गटाचे कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांचा पंटर असलेल्या अमर मिसाळ याने शासकीय जमिनी हडप करून त्या परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उरणमध्ये समोर आला आहे. विरार- अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मिंध्यांच्या बगलबच्च्यांचा हा कारनामा उघडकीस आला आहे. याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्हावा- शेवा पोलिसांनी मिसाळवर गुन्हा दाखल केला आहे. सत्तेच्या जोरावर खुलेआमपणे भूमाफियांनी चालवलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
विरार-अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती. विंधणे येथे नुकसानभरपाईसाठी दोन व्यक्तींनी दावा दाखल केला. त्यावेळी मिंधे गटाचे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ याने शासकीय जमिनी हडप करून त्या परस्पर विकल्याचे समोर आले आहे. ही जागा हडप करण्यासाठी मिंध्यांच्या भूमाफियांनी 1985 सालचे बनावट वाटप पत्र तयार केले होते. नंतर हेच बनावट वाटप पत्र 2020 मध्ये उरण तहसीलदारांसमोर सादर केले. त्यामुळे ही जमीन बोगस मालकाकडे हस्तांतरित झाली.
गेलाराम भुरोमल नावाच्या व्यक्तीला फसवणूक करून हस्तांतरित केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यानंतर बेनी ब्रायन डिसुझा नावाच्या व्यक्तीने गेलाराम भुरोमल या नावाने तहसीलदारांसमोर हजर राहून जमिनीचे अभिलेख हस्तांतरित करून घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.
मूळ मालक फाळणीच्या वेळी देश सोडून गेले
या जमिनीचे मूळ मालक हे देशाची फाळणी झाली तेव्हा देश सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची जमीन ही सरकारने ताब्यात घेतली. ही जमीन जरी कागदोपत्री शासनाकडे असली तरी प्रत्यक्ष अनधिकृत ताबा हा भूमाफियांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ही जमीन हडप केली आणि तिची परस्पर विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.