आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा – अहिका-सुतीर्था जोडीला ऐतिहासिक कांस्य

अहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी या हिंदुस्थानी जोडीने आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडविला. स्पर्धेच्या 52 वर्षांच्या इतिहासात हिंदुस्थानला सांघिक प्रकारानंतर इतर गटातही पदक मिळाले, हे विशेष. याआधी, हिंदुस्थानच्या महिला संघाने या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.

अहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी या हिंदुस्थानी जोडीला रविवारी उपांत्य लढतीत मिवा हारिमोटो व मियु किहारा या जपानी जोडीकडून 0-3 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे हिंदुस्थानी जोडीला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. जपानी जोडीने पहिला गेम 11-4 फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्येही हिंदुस्थानी जोडीचा 9-11, 9-11 असा पराभव झाला.

अहिका व सुतीर्था जोडीने उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य दक्षिण कोरियाचा 10-12, 11-7, 11-9, 11-8 (3-1) असा पराभव केला होता. त्यामुळे या जोडीकडून देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, जपानविरुद्ध पराभव झाल्याने हिंदुस्थानी जोडीचे अभियान कांस्यपदकावरच संपुष्टात आले.

मानव, मानुष अंतिम 16मध्ये

हिंदुस्थानच्या मानव ठक्करने पुरुष एकेरीत 14व्या मानांकित दक्षिण कोरियाच्या जँग वृजिन याचा संघर्षपूर्ण लढतीत 3-2 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर मानुष शाहने 23व्या मानांकित दक्षिण कोरियाच्या एन जेह्यू याचा 3-0 फरकाने धुव्वा उडवित अंतिम 16मधील स्थान पक्के केले.