नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी योजनांचा पाढा वाचताच लाडक्या बहिणी सभामंडपाबाहेर

दोन वेळा रद्द झालेला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम अखेर आज नवामोंढा मैदानावर पार पडला. मात्र सकाळी 11चा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू झाला. त्यामुळे दिवसभर ताटकळलेल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांनी योजनांचा पाढा वाचल्याने काढता पाय घेतला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या मतांच्या भिकेला उपस्थितांनी फारसा प्रतिसाद न देता मंडपातून जाणेच पसंत केले.

नवोंढा मैदानावर 7 आणि 10 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम रद्द झाला होता. त्यामुळे आजदेखील मुख्यमंत्री येतील की नाही याविषयी जनतेला शंकाच होती. मात्र सकाळी 11 वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू झाल्याने महिलांना तब्बल सात तास मुख्यमंत्र्यांची वाट बघत ताटकळत बसावे लागले. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले. मात्र त्यांनी योजनांचा पाढा वाचणारे भाषण सुरू करताच महिलांनी मंडपातून काढता पाय घेतला.