डॉक्टरांचा आजपासून देशव्यापी संप, रुग्णालयांतील काही सेवा बंद राहणार; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांना सुरक्षा देण्यासह विविध मागण्यांसाठी कोलकात्यात कनिष्ठ डॉक्टरांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आता या आंदोलनाची धग आणखी वाढली असून उद्यापासून देशभरातील रुग्णालयांतील काही सेवा बंद राहणार आहेत. द फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान संपाचा निर्णय घेण्यात आला.

डॉक्टरांनी संप पुकारला असला तरी रुग्णांना 24 तास अत्यावश्यक सेवासुविधा मिळतील याची काळजी घेण्याचे आवाहन निवासी डॉक्टर संघटनेला करण्यात आले आहे. आम्ही पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांसोबत खंबीरपणे उभे आहोत असे द फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. आता संपूर्ण देशातील डॉक्टरांनी एकत्र येण्याची ही वेळ असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिले, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची समाधानकारक कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

चार आंदोलक डॉक्टरांची प्रकृती बिघडली

डॉक्टरांची सुरक्षा आणि विविध मागण्यांसाठी 6 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसलेल्या कोलकात्यातील कनिष्ठ डॉक्टरांची प्रकृती बिघडली आहे. डॉ. अनुस्तुप मुखर्जी या डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रात्री अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आणखी तीन डॉक्टरांची प्रकृती बिघडली असून त्यांना काही झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.