बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; तपास गुन्हे शाखेकडे

मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बोपदेव घाट परिसरात 3 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (20, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास 60 पथकांकडून करण्यात येत आहे. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी कनोजिया आणि त्याचे साथीदार लुटमारीचे गुन्हे करण्यासाठी मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. घाटात एके ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लुटमार करण्याच्या तयारीत होते. त्या वेळी त्यांनी एकांतात बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एके ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले.

आरोपींनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर करीत सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले. आरोपींनी त्या भागात यापूर्वी लुटमारीचे गुन्हे केल्याने त्यांना तेथील माहिती होती. सीसीटीव्ही कॅमरे कोणत्या भागात आहेत, याचीही त्यांना माहिती होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. दररोजच्या खून, महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृह खात्याची लक्तरे चव्हाट्यावर आल्यामुळे तमाम जनतेने आपली सुरक्षा स्वतःच करावी, असे फलक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा पंचनामा मांडण्यासाठी लावलेले हे फलक लक्षवेधी ठरत आहेत.