ओव्हरटेकच्या वादातून मालाड येथे तरुणाची हत्या

रिक्षा चालकाने मोटारसायकलला ओव्हर टेक करण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली. आकाश माईन असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश कदमला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. ज्याच्याशी मोटारसायकलचालकाचे भांडण झाले ते तीन जण पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. माईनचा ट्रव्हलचा व्यवसाय होता. तो पत्नी सोबत हैद्राबाद येथे राहत होता.

शनिवारी माईन हा दसरा निमित्त आई वडिलांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. घटनेच्या वेळी माईन हा त्याच्या पत्नी सोबत मोटसायकलवरून जात होता. तर त्याचे आई वडील हे ऑटो रिक्षा मध्ये बसले होते. माईनच्या मोटारसायकलला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नांत रिक्षाने कट मारली. त्यावरून रिक्षा चालक अविनाश आणि आकाशचा वाद झाला. बाचाबाची दरम्यान कदमचे मित्र आणि काही ऑटो चालक त्याच्या मदतीला आले. हाणामारीत दोन जखमी झाले. माईनला त्याच्या पत्नी आणि पालकांनी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी माईनला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी कदमला ताब्यात घेतले. तर माईनच्या मृत्यूची माहिती समजताच कदमचे मित्र पळून गेले. घडल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद करून कदमला अटक केली. कदमला पोलीस कोठडी सुनावली आहे.