मुंबई सेंट्रल येथून कारशेडमध्ये शिरताना लोकलचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना आज दुपारी घडली. त्यामुळे संपूर्ण लोकल वाहतूक विस्कळीत झाली आणि सुट्टीच्या दिवशी कुटुंबकबिल्यासह नातेवाईकांकडे निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई सेंट्रलजवळ लोकलचे दोन डबे रुळावरून घसरले. ही लोकल कारशेडमध्ये शिरत असल्यामुळे रिकामी होती. त्यामुळे कुणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
ट्रक ब्लॉक केल्याने मेगाहाल
लोकलचे डबे घसरल्यानंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान दादरच्या दिशेने जाणारा धीम्या मार्गावरील लोकल ट्रक ब्लॉक करण्यात आला आणि चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या दोन स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून गाड्या पाठवल्या गेल्या. परंतु धीम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि प्रभादेवी, लोअर परेल, महालक्ष्मी या रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची मात्र प्रचंड तारांबळ उडाल्याचे चित्र होते.