चेन्नईतील एका कंपनीने दिवाळीपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि बाईक भेट म्हणून दिली आहे. ‘टीम डिटेलिंग सोल्युशन्स’ असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्टील डिझाइन क्षेत्रात काम करते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिलेल्या कारमध्ये ह्युंदाई, टाटा, मारुती, सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीने त्यांच्या 28 कर्मचाऱ्यांना कार, तर 29 कर्मचाऱ्यांना दुचाकी भेट म्हणून दिली आहे.
यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन म्हणाले, आमचे कर्मचारी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कर्मचारीच आमची संपत्ती आहे. कंपनीच्या यशात या कर्मचाऱ्यांचे मोठं योगदान आहे. त्यांना आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आम्ही त्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन यांनी दिली.