Baba Siddique Murder – बॉलिवूड शोकसागरात, सलमान-संजय दत्तची धावपळ; शिल्पाला अश्रू अनावर, रितेशची संतप्त पोस्ट

अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे.

गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक गोळी छातीत, तर दोन पोटात लागल्या होत्या. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली. अभिनेता संजय दत्त, सलमान खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी धावतपळत रुग्णालय गाठले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बाबा सिद्दिकी यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर झाल्याचे दिसले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. बाबा सिद्दिकी गेल्याचे कळताच तिला रडू कोसळले. कारमधून उतरून ती तडक रुग्णालयात पोहोचली. तत्पूर्वी संजय दत्तनेही रुग्णालयात धाव घेतली. तसेच रात्री दोनच्या सुमारास सलमान खानही रुग्णालयात पोहोचला. तसेच त्याने बिग बॉसचे चित्रिकरणही रद्द केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

रितेशची संतप्त पोस्ट

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख यानेही बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एक ट्विट केले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल कळताच मला धक्का बसला आहे. मला अत्यंत दु:ख होत आहे. झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कोर्टात खेचलं पाहिजे, असे रितेशने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.