Baba Siddique shot dead – बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटामध्ये सामील झालेले बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी एक आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्युचे वृत्त धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच मिंधे सरकारवरही हल्ला चढवला.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

नक्की काय घडलं?

बाबा सिद्दिकी एका कार्यक्रमासाठी बाहेर निघाले होते. याचवेळी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 ते 6 राऊंड गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीवर आणि दोन पोटात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दोघांना अटक

दरम्यान, गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशा दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी एक हरियाणाचा तर दुसरा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तिसऱ्या आरोपीचीही ओळख पटली असून त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथके रवाना झाले आहेत.

कोण आहेत बाबा सिद्दिकी?

लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले. बाबा सिद्दिकी वांद्रे पश्चिम येथून 1999, 2004 आणि 2009 मध्ये तीन वेळा आमदार राहिले असून काँग्रेसच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या मुंबई विभागाचे अध्यक्षही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दिकी यांनी भाजपा नेते आशीष शेलार यांचा पराभव केला होता. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हेदेखील राजकारणात असून वाद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत.