नागपुरात लोटला भीमसागर, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळय़ासाठी लाखो अनुयायींची गर्दी 

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळय़ानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी शनिवारी नागपूरमधील दीक्षाभूमीवर दाखल झाले. सकाळपासून पाऊस होता तरी अनुयायांनी शांततेत रांगेत उभे राहून दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. धम्मदीक्षा सोहळय़ात देशाच्या विविध राज्यासह काही जपानी नागरिकांनी दीक्षा दिली गेली. यंदा दीक्षाभूमीवर 50 हजार लोकांद्वारे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली जाण्याचा अंदाज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवरच क्रांतीची सुरुवात केली होती. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर आपल्या पाच लाखांहून अधिक अनुयायांना बौद्ध धर्माची ओळख करून दिली. डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी या दिवशी देशभरातून बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अनुयायींची ये-जा सुरू झाली होती. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच अनुयायींच्या रांगा लागल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी शेकडो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

संविधानाला सर्वाधिक मागणी 

दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर यंदाही महापुरुषांवर आधारित पुस्तकाचे शेकडो स्टॉल लावण्यात आले होते. ‘भारताचे संविधान’ तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी असल्याचे पुस्तक विव्रेत्यांनी सांगितले.