इराण आणि इस्रायलमध्ये सध्या तणाव सुरू आहे. असे असतानाच इस्रायलने शनिवारी इराणच्या आण्विक स्थळांसह अणु केंद्रांना लक्ष्य करत सायबर हल्ले केले. याशिवाय अनेक आस्थापनांवर एकाच वेळी सायबर हल्ले झाल्याने इराण सरकारच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. इराणवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी कार्यालयांवर गंभीर सायबर हल्ले झाल्याने यंत्रणा विस्कळीत झाल्याचे इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी सांगितले.
आमच्या अणु प्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, स्थानिक सेवा, वाहतूक आणि बंदरे यासारख्या महत्त्वाच्या नेटवर्कवरही सायबर हल्ला झाल्याचे फिरोजाबादी पुढे म्हणाले.
इराणने 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या क्षेपणास्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जाते. क्षेपणास्त्र हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल, तसेच हा बदला घातक आणि आश्चर्यजनक असेल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी दिला होता.