अभिप्राय – मुलांसाठी मार्गदर्शक

>> अस्मिता प्रदीप येंडे

माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. माणसामध्ये चांगले-वाईट गुण असतातच. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण पहिल्यांदा करतो तेव्हा ती आपल्यासाठी नवीन असते. पण त्या कामात किंवा कृतीत आपण सातत्य ठेवले की ती गोष्ट आपल्या सवयीची होऊन जाते. सवय म्हणजे एखादी गोष्ट आपण न विसरता सहजपणे अंमलात आणतो, ती सहज कृतीत अवतीर्ण होते. कुटुंबात  जसजसे मुलाला गोष्टी समजू लागतात, तेव्हा त्या मुलाला घरातील सदस्य, आईबाबा असे कर किंवा असे नाही करायचे, असे लाडिकपणे सांगत असतात. याचे कारण जर चुकीच्या गोष्टी मूल सातत्याने करु लागले तर मोठेपणी ती सवय जाता जात नाही. मुलांच्या मनावर एखादी गोष्ट बिंबवली गेली की त्याचा परिणाम निरंतर राहतो. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी पालक प्रयत्नशील असतात.

मुळात  वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, त्या सवयी आपोआप जडतात पण चांगल्या, सकारात्मक गोष्टी ह्या जाणीवपूर्वक शिकवाव्या लागतात. चांगल्या सवयींमुळे  मुलांच्या जीवनाला एक दिशा मिळते. आपल्या पाल्यावर चांगले संस्कार व्हावेत, असे प्रत्येक पालकाला वाटते. मग त्यासाठी पालकांनी काय करायला हवे, त्यांची भूमिका काय असावी, याचे उत्तर म्हणजे ‘मुलांसाठी 101 प्रभावी सवयी’ हे पुस्तक होय.

लेखक मनोज अंबिके  लिखित ‘मुलांसाठी 101 प्रभावी सवयी’ हे पुस्तक मुलांच्या वैचारिक, बौद्धिक आणि व्यक्तित्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.  या पुस्तकात 101 प्रभावी सवयींवर लेखकाने अत्यंत सहज सोप्या पध्दतीने भाष्य केले आहे.  रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या सवयी मुलांना असणे गरजेचे आहे, त्या अगदी जुजबी पण महत्त्वाच्या सवयींची ओळख करून दिली आहे.  या सवयींमुळे मुलांचा मानसिक, बौद्धिक विकास तर होईलच शिवाय चारचौघात वावरताना त्यांचे  वैयक्तिक आणि सामाजिक व्यक्तित्व प्रभावी दिसेल. खास मुलांसाठी आणि पालकांसाठी ‘मुलांसाठी 101 प्रभावी सवयी‘ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले, ही खात्री आहे.

हे पुस्तक वय वर्षे 3 ते पुढील अशा वयोगटासाठी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक फक्त मुलांसाठी नाहीतर पालकांसाठीसुद्धा आहे. यातील लेख अगदी मुद्देसुद पद्धतीने रचलेले आहेत. मुलांना सहज आकलन होईल अशा प्रकारे लेखकाने शब्दरचना केली आहे.पुस्तकाचा मूळ हेतू हा आहे की, फक्त पुस्तक वाचून थांबायचे नाहीतर या सवयी अंगिकारण्यासाठी प्रयत्न करणे सोबतच पालकांनी त्या गोष्टी अंमलात आणण्यास मुलांना  सहाय्य करणं, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अर्थात हे पुस्तक कृतीयुक्त शिक्षण  संकल्पना अधोरेखित करते.

मुलांसाठी 101 प्रभावी सवयी

लेखक : मनोज अंबिके

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाउस   मूल्य : 275 रुपये