वाचावे असे काही- मुंबईच्या इतिहासाचा लेखाजोखा 

>> धीरज कुलकर्णी

मुंबईला हिंदुस्थानची आर्थिक राजधानी म्हणतात. ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातल्या आगमनापासूनच्या इतिहासाची ही नगरी साक्षीदार. या काळात कितीतरी चढ-उतार पाहिलेले. सगळ्या जातीधर्माच्या लोकांना सामावून घेऊन सतत पुढे जातेय मुंबई. देशातल्या गरीबापासून श्रीमंताला भुरळ घालतेय.

कला, साहित्य, संस्कृती असो की अर्थकारण, उद्योग, व्यवसाय क्षेत्रे असोत, राजकारण असो की क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात मुंबईचा एक स्वतंत्र ठसा आहे. देशभरातून लोक आपापल्या स्वप्नांना भरारी द्यायला इथे आले, इथलेच झाले आणि जगावेगळी एक संस्कृती उदयाला आली. ही सांस्कृतिक सरमिसळ आणि तिची स्थित्यंतरे मुंबईने आपल्या आत सहज वाहिली.

मुंबईतील गिरण्या हे एक वेगळेच रसायन होते. लालबाग, परळ, गिरणगाव इथला बहुसंख्येने मराठी कामगार वर्ग. त्यांच्या चळवळी, त्यांची कलापथके, मेळे, साहित्य, नाटय़ अशा अनेक गोष्टींनी मराठी साहित्य संपन्न केले आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांनी तर माझे विद्यापीठ म्हणून याचा गौरव केला आहे.

असं म्हणतात की, मुंबईवर इंग्रजी भाषेत दर आठवडय़ाला एक पुस्तक बाजारात येतं. पण अस्सल मुंबई जर मराठी माणसाला वाचायची असेल तर कोलटकर, सुर्वे, ढसाळ यांचे मराठी साहित्य हे खरे.

‘परळ 68’ ही 1965 सालातील मुंबईचे वर्णन करणारी दिवाकर कांबळी यांची कादंबरी. दिवाकर कांबळी हे रूढार्थाने सिद्धहस्त लेखक नव्हेत. ‘गिरणगाव नाका’, ‘परळ 68’ आणि ‘डोकेफूट’ अशा इनमिन तीन कादंबऱया या लेखकाच्या नावावर. ते बँकेत काम करत. मुंबई, त्यातही कामगार वस्ती असलेला भाग हा त्यांचा आवडीचा विषय. मुंबईतील गिरण्यांच्या त्या वैभवशाली दिवसांचे ते साक्षीदार होते. तेच त्यांच्या लेखनात उतरले. त्यामुळे त्या लेखनात सच्चेपणा, प्रामाणिकपणा आहे.

तळकोकणातील सावंतवाडीजवळच्या एका गावातून नायक नोकरीच्या शोधात मुंबईत येतो आणि संघर्ष करत बँकेत नोकरीत स्थिरावतो. या संघर्षाच्या काळात तिथे भेटलेले लोक, मित्र, आसपास काळ बदलून टाकणाऱया घडलेल्या घटना या सर्वातून बाहेर पडणे आणि स्थिर होणे असा कादंबरीचा एकूण आलेख आहे.

नायक मुंबईत आल्यानंतर नातेवाईकांच्या घरी राहू लागला. बराच काळ नोकरी मिळेना. त्यामुळे त्या घरातून वागणूक सापत्न मिळू लागली. एक तात्पुरती नोकरी मिळाली. चाळीचा भाग बहुतेक कामगार वर्ग. तिथे दोस्त मिळाले तेसुद्धा कोण तर फुटपाथवर पेपर स्टॉल चालवणारे, पोते, गल्लीमधले गुंड, मटक्याच्या, दारूचा अड्डा चालवणारे असे. मात्र असे असून नायक कधी दारूला स्पर्श करीत नाही की जुगार खेळत नाही. तो घटना अलिप्तपणे पाहतोही, पण त्याबद्दल आपले मत अवश्य नोंदवतो.

त्याकाळी म्हणजे 1965 सालच्या दरम्यान दाक्षिणात्य लोक अनेक क्षेत्रांत मुंबईत भरती होत. अशांची यादीच प्रत्येक ‘मार्मिक’च्या अंकात बाळ ठाकरे छापत. शीर्षक होते, ‘वाचा आणि स्वस्थ बसा.’ बाळ ठाकरेंच्या घणाघाती लेखनामुळे कामगार वर्ग जागा झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर तिचा मुंबईत विस्तार झपाटय़ाने झाला. बाकी इतिहास तर सर्वज्ञात आहे, परंतु या इतिहासामागेही अनेक गोष्टी होत्या. शिवसेनेचा फायदा बाकी लोकांनी कसा उठवला, दंगे कसे केले हेसुद्धा या कादंबरीत वाचायला मिळते.

पेपर स्टॉल चालवणारा भास्कया, गजा फूलवाला, बाळा, अनाथ करूबाळा अशी अनेक व्यक्तिचित्रे ठळकपणे आली आहेत. गजा फुलवाला नायकाला रोज दोन टपोरे गुलाब देतो, ते गुलाब पाहून गजाला न पाहताच त्याच्या प्रेमात पडलेली ऑफिसमधली वासंती, गजाचा रस्त्यावर खून झाल्यावर उद्ध्वस्त होते. दारूच्या व्यसनापायी अनेक मित्र बरबाद होतात. फ्लश मटका चालवणारे गजाआड जातात. नायक बँकेत नोकरीला लागतो आणि स्थिर आयुष्य जगू लागतो. असे अनेक संदर्भ आपणाला fिदसत राहतात.  कादंबरीतील अनेक संदर्भ हे काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्या इतिहासाच्या खुणा आजही मुंबईत कुठेतरी दिसत राहतात.

दिवाकर कांबळी यांची लेखन शैली वाचनीय आहे. बऱयाच ठिकाणी भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत यांचा भास होतो खरे. पण शैली स्वतंत्र आहे. मुंबईचा इतिहास सांगणाऱया लेखाजोख्यात ‘परळ 68’सारख्या साहित्याचेही एक स्थान आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.