मोनेगिरी – अविश्वसनीय !!

>> संजय मोने

कोणाचा शेर कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल हे ठरवणारा वेगळाच असतो या न्यायाने ते तिघे एकाच ठिकाणी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करू लागले. पुढेही एकत्रच राहिले पण… नियतीच्या मनात जे होतं ते तिघांपैकी नेमकं कोणी जाणलं होतं? हा प्रश्न सर्वांसाठीच उरला.

यातल्या एकाही व्यक्तीला मी आयुष्यात कधीही भेटलो नाही. अकोल्याला गेलो होतो काही कामासाठी. मित्र होता,भलामोठा वाडा होता त्याचा. बायको मुलीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी गेली होती म्हणून मी त्याच्याचकडे मुक्काम केला. तीन दिवसांचा प्रश्न होता. त्याच्या बाजूच्या वाडय़ात एक माणूस राहत होता. आजच्या लेखातल्या तीन पुरुषांपैकी तो एक. मुळात तीन एका ठिकाणी नोकरी करणारे नोकर होते. सावंत, देशमुख आणि पिल्लई. तिघेही मित्र. कंपनीने घरं दिली होती. वेगवेगळय़ा ठिकाणी होती. तिथे राहायचे. कंपनीचं आवार सुमारे पन्नास एकरच्या आसपास होतं. त्यामुळे त्यांची घरं एकमेकांपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर होती. साधारण एकाच महिन्यात त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली होती. सावंत कोकणातला, पण शिकायला लोणावळ्यात. देशमुख विदर्भातला, पण शिकायला तिथेच. म्हणजे दोघे महाराष्ट्रातले. पिल्लई मात्र पालघाट केरळ इथला. कोणाचा शेर कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल हे ठरवणारा वेगळाच असतो या न्यायाने ते तिघे एकाच ठिकाणी आपल्या कारकीर्दीची सुरुवात करू लागले. नोकरीत रुळल्यावर पहिल्यांदा सावंत बोहल्यावर चढला. लग्न करून बायकोला नोकरीच्या ठिकाणी घेऊन आला. आता तिघांच्या मैत्रीत एक स्त्राr आली, म्हणजे भेटीगाठी कमी होणार असं तिघांनाही वाटलं. म्हणजे सावंत बोलला नाही, पण देशमुख आणि पिल्लई यांनी त्याबाबतीत सावंतच्या परोक्ष चर्चा केली. पण एके दिवशी सावंतची बायको सीमा दोघांच्या घरी थडकली आणि जेवणाचं आमंत्रण देऊन परतली. सगळे रात्री जेवायला बसले.त्याआधी ते तिघे जेवायला जमायचे तेव्हा साथीला रंगीत पाणी आणि सोडा असायचा. सीमाने तीही तयारी केलीच होती, पण साथीला उत्तम कबाब वगैरेही सज्ज ठेवले होते. आग्रह करकरून तिने जेवण वाढलं. मग अशा मैफली रंगत गेल्या. हळूहळू सीमा दोघांसाठी वहिनी कमी आणि बहीण जास्त होत गेली. सीमा एक दिवस त्या तिघांच्या साहेबांना भेटली आणि उरलेल्या दोघांची कंपनीने दिलेली घरं बदलून घेतली. आता ते तिघेही अगदी जवळ जवळ राहायला आले. मग त्यांच्या मैफली जवळपास रोजच होऊ लागल्या. सीमाच्या हाताला अप्रतिम चव होती.देशमुख आणि पिल्लईला घरचं सुग्रास जेवण मिळायला लागलं. देशमुख जरा तुटक वागतोय आणि थोडा खिन्न असतो हे सीमाच्या लक्षात आलं. एकदा पिल्लई आणि सावंत कामानिमित्त दोन-चार दिवस बाहेरगावी गेले होते आणि देशमुख एकटाच घरी होता. नेहमीप्रमाणे तो जेवायला सीमाच्या घरी आला. तिने विषय काढून त्याला बोलतं केलं. देशमुख एका मुलीच्या प्रेमात होता, पण मुलीच्या घरून टोकाचा विरोध होता. तिने सगळं ऐकून घेतलं. सावंत आणि पिल्लई परत आल्यावर कोणालाही न सांगता ती निघून गेली. चार दिवसांनी ती देशमुखची प्रेयसी प्रियदर्शनी आणि तिचे आईवडील यांना घेऊनच परतली. त्याच रात्री देशमुखचं लग्न तिने अगदी तारखेसकट जमवलं. तिघेही सुट्टय़ा जमवून लग्न उरकून प्रियदर्शनीला घेऊन परतले. सीमाने गृहप्रवेश वगैरे सगळे सोपस्कार साग्रसंगीत पार पाडले. सुदैवाने प्रियदर्शनी त्यांच्या सगळ्यात अगदी फिट्ट बसली. आता सगळ्यांच्या घरातला आनंद अजून द्विगुणित झाला. एकत्र जेवणं, गप्पा, टीव्ही बघणं, एखाद दिवशी शक्यतो शनिवारी चित्रपट लावून रात्र जागवत बसणं. एकंदरीत सगळी मजा होती. तसा पिल्लई थोडा वयाने दोन-तीन वर्षांनी लहान होता. सीमा त्याला तशीच वागवत होती. प्रियदर्शनी आणि पिल्लई यांच्या वयात फार फरक नव्हता. त्यामुळे त्यांचीही गट्टी जमली. त्याचं प्रमुख कारण म्हणजे ती बरीचशी शाकाहारी होती आणि पिल्लई पूर्ण शाकाहारी होता. त्यावरून ‘गवतखाऊ’, ‘बकरा’ असं म्हणून त्याला उरलेले सतावत असत. सीमा मात्र त्याच्यासाठी कायम शाकाहारी स्वयंपाक वेगळा करायची. दृष्ट लागेल असं त्यांचं आयुष्य चाललं होतं आणि खरंच दृष्ट लागली.

सावंत एक दिवस त्याची गाडी घेऊन कामासाठी निघाला. दोन दिवसांत परत येणार होता, पण चार दिवस झाले, तो आला नाही. तेव्हा मोबाइल नव्हते. त्यामुळे संपर्क होऊ शकत नव्हता. जसं शक्य असेल त्या-त्या मार्गाने त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला गेला. आठवडे लोटले, महिने गेले. सावंतचा थांगपत्ता लागत नव्हता. सगळे काळजीत होते. फक्त सीमा शांत होती. सावंत नाहीसा झाला तेव्हा सीमाला दिवस गेले होते. ती प्रसृत झाली आणि मुलगी जन्माला आली.

“ते परत येतील, उगाच माझी काळजी करू नका” असं ती सगळ्यांना सांगायची. काळ उलटला. सगळ्यांच्या दृष्टीने सावंतचं अस्तित्व उरलं नव्हतं. एकटा पिल्लई तिच्याशी जवळीक साधून होता. तिच्या बाळाची काळजी घेत होता, लागेल ती मदत करत होता. सकाळ -संध्याकाळ सावलीसारखा तिच्या बरोबर असायचा. तीन वर्षं झाली. सावंत बेपत्ता झाला त्याला आणि कंपनीच्या नियमानुसार त्याला मृत घोषित केलं गेलं. तिला तिचं घर रिकामं करायला लागणार होतं. अचानक एका रात्री पिल्लई देशमुखच्या घरी गेला. त्याच्या बायकोला, प्रियदर्शनीला त्याने बाजूला बोलावून घेतलं

“प्रियदर्शनी! आता सीमा आणि मुलगी कुठे जाणार?”
“माहीत नाही.”
“मी तिच्याशी लग्नं केलं तर?”
“पिल्लई! वेडा आहेस का? तिला अजूनही वाटतं की, सावंत सर परत येतील.”
“प्रिया! मी तुला जे सीमाबद्दल सांगितलं त्याचा तू विचित्र अर्थ काढणार नाहीस म्हणून म्हणालो. आयुष्य तर पुढे जातच असतं. तिने भविष्याचा विचार करायला हवा.” बराच वेळ ते दोघे बोलत होते. प्रियदर्शनीला पिल्लई म्हणाला ते पटत होतं. शेवटी एक दिवस सगळे बसले आणि सीमाला पटवून दिलं. पिल्लई तिला म्हणाला,
“मी तुला स्पर्शही करणार नाही. फक्त कायद्याने तू माझी बायको असशील.”

काही आठवडय़ांनी दोघांनी लग्न केलं. पिल्लईला वरची जागा मिळाली आणि तो बदली घेऊन दुसऱया शहरात गेला. दोन वर्षे निघून गेली. दरम्यान सीमाला आणि पिल्लईला एक मुलगाही झाला. सावंतला सीमा विसरली नाही, पण आठवणी पुसट होत गेल्या.

अचानक एक दिवस सावंत परत आला. झालं होतं असं की, त्याला अपघात झाला आणि त्याची गाडी दरीत कोसळली, पण तो वाचला. अनेक महिने तो बेशुद्ध होता. तिथल्या निरक्षर आदिवासींना सावंतबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. सावंत शुद्धीवर आला तो सात-आठ महिन्यांनी, पण त्याला काहीही आठवत नव्हतं. शरीरातली असंख्य हाडं मोडली होती. तो चालू लागला होता, पण स्मरणशक्ती परत आली नव्हती. तब्बल पाच वर्षांनी सावंतला सगळं आठवलं आणि तो परत आला.

“पुढे काय झालं? सीमा आणि पिल्लई यांचं काय?” हे मी देशमुखला विचारलं. कंपनीत सगळ्यांना सगळा प्रकार माहीत होता. त्यामुळे सीमा निघून गेली. तिचा पत्ता कोणालाच माहीत नाही, असं सगळ्यांनी सांगितलं. देशमुख दरम्यान दुसरीकडे नोकरी पत्करून तिथून निघून गेला होता. झाला प्रकार त्याने पिल्लईला कळवला आणि सीमाला यातलं काहीही सांगू नकोस, असं त्याला बजावलं.

“मग आता?” माझ्या मित्राने त्याला विचारलं.
“त्यांची कधीही भेट होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना” असं म्हणून अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून देशमुख निघून गेला.
खरंच पुढे काय झालं असेल? किंवा होऊ शकतं?