हरयाणात भाजपला फक्त एक टक्का मते जास्त मिळाली. पण काँग्रेसला सत्तेपासून त्यांनी पुन्हा रोखले. काँग्रेसच्या मतांत 13 टक्के वाढ होऊनही उपयोग झाला नाही. हरयाणातील भाजपचा विजय अनपेक्षित आहे. वातावरण काँग्रेसमय होते. तरीही हा अपघात का झाला? हरयाणवी जनतेने भाजपविरोधात लाठीच उगारली होती!
हरयाणात भाजपला फक्त एक टक्का मते जास्त मिळाली. पण काँग्रेसला सत्तेपासून त्यांनी पुन्हा रोखले. काँग्रेसच्या मतांत 13 टक्के वाढ होऊनही उपयोग झाला नाही. हरयाणातील भाजपचा विजय अनपेक्षित आहे. वातावरण काँग्रेसमय होते. तरीही हा अपघात का झाला? हरयाणवी जनतेने भाजपविरोधात लाठीच उगारली होती!
लोकसभा निकालानंतर कोमेजलेला चेहरा फुलवत आपले पंतप्रधान मोदी हे हरयाणातील विजयाचे लाडू खाताना देशाने अनुभवले. जणू त्यांनी दिग्विजय मिळवला. पंतप्रधान मोदी हे सदैव विदेश दौऱ्यावर असतात. ते विदेशात नसतात तेव्हा देशातील निवडणूक प्रचारात फिरताना दिसतात. हरयाणा व जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले. हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला. त्याच वेळी जम्मू-कश्मीरात मोदी व शहांचा पराभव झाला. पण हरयाणातील काँग्रेस पराभवाचीच चर्चा भाजपने जास्त सुरू केली. सीमेवरील एका महत्त्वाच्या व संवेदनशील राज्याने मोदी-शहांना नाकारले. त्यावर कोणीच चर्चा करीत नाही. राजकारणाची सर्व चर्चा काही काळासाठी हरयाणाकडे वळली आहे. हरयाणातील काँग्रेसचा पराभव देशात एकवटलेल्या ’इंडिया आघाडी’साठी धक्का आहे. हरयाणात या वेळी काँग्रेसचा विजय नक्कीच होता. विजयाचे ताट भरून लोकांनी काँग्रेसच्या समोर आणले. पण ताटातला घास ओठांपर्यंत येण्याआधीच भाजपने ताट उचलून नेले असेच एकंदरीत दिसते.
नेतृत्व कोणाचे?
हरयाणातील काँग्रेस गेली 10-15 वर्षे भूपेंद्रसिंग हुड्डा या एकाच नेत्याभोवती फिरते व त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन निवडणुका काँग्रेस हरली. हुड्डा हे हरयाणातील जाटांचे नेते. सर्व जाट समाज त्यांच्या मागे उभा राहिला. पण उरलेल्या 56 टक्के इतर समाजावर भारतीय जनता पक्षाने काम केले. काँग्रेसला मिळणारी मते खातील असे जातीनिहाय अपक्ष उमेदवार भाजपने सर्वच मतदारसंघांत उभे केले. या अपक्ष उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली व त्यांची प्रचार यंत्रणा भाजपच्या दिल्ली मुख्यालयातून हलवली. हरयाणातील वातावरण काँग्रेसला पोषक होते. भाजप सरकार दहा वर्षे होते. त्या सरकारविरुद्ध नाराजी होती. पण काँग्रेसचे विद्यमान 16 आमदार या निवडणुकीत पराभूत झाले. नाराजी ही फक्त सत्ताधारी लोकांविरुद्ध नसते, ती विरोधी पक्षातील वर्षानुवर्षे खुर्च्या बळकावणाऱ्या लोकांविरुद्धदेखील असते. राज्यात बदल हवा असा लोकांचा कल असेल तर विरोधी पक्षाने स्वत:च्या अंतरंगातही डोकावून पाहायला हवे. हरयाणात हे झाले नाही. राहुल गांधी व प्रियांका गांधींना हरयाणात मोठा प्रतिसाद मिळाला. गांधींवर लोकांचे प्रेम. पण हरयाणात काँग्रेसला गांधींच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेता आला नाही. हरयाणातील काँग्रेस का हरली?
हरयाणात काँग्रेसला स्वबळावरच सत्ता स्थापन करायची होती? व तसे वातावरण होते. ‘इंडिया आघाडी’तील कोणत्याही घटक पक्षाला त्यांनी सोबत घेतले नाही. हरयाणात समाजवादी पार्टीला व ’आप’ला सोबत घ्यायला हरकत नव्हती. तिकीट व उमेदवारी वाटपावर भूपेंद्र हुड्डा यांचाच प्रभाव होता व दिल्लीचे ’हायकमांड’ही त्यात फार हस्तक्षेप करू शकले नाही, असे हरयाणातील पत्रकार सांगतात.
भाजपविरोधी लाठी
हरयाणातील गावागावांत भाजपविरोधी रोष होता. भाजप नेत्यांना गावांत येऊ दिले जात नव्हते. हरयाणातील शेतकऱ्याने भाजपविरोधात तीव्र आंदोलनाची लाठीच उचलली होती. ‘अग्निवीर’ योजनेबाबत सगळ्यात जास्त चीड हरयाणातील तरुण वर्गात होती. कारण हरयाणातील सर्वाधिक तरुण सैन्यात आहेत. महिला खेळाडूंचा अपमान व विनयभंगामुळे हरयाणात खदखद होती व भाजपला आता धडा शिकवणारच अशा गर्जना गावागावांत सुरू होत्या. त्याच हरयाणात भाजपच्या झोळीत मतदान पडले व काँग्रेसला मागे टाकले हे कोडेच आहे. भूपेंद्र हुड्डा व कुमारी सेलजा यांच्यातील वाद हा निवडणूक काळात टोकाला गेला. हरयाणाच्या जनतेने भाजपविरोधात लाठी उगारली. पण हरयाणातील काँग्रेसमध्ये आपापसात ’लाठीचार्ज’ उघडपणे सुरू झाला. हे सर्व माध्यमांत प्रसिद्ध झाले. कुमारी सेलजा या दलित समाजाच्या नेत्या. त्यांना प्रचारात येऊच दिले नाही. तरीही जनतेने काँग्रेसला मतदान केले. 2019 साली काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा 13 टक्के जास्त मते या वेळी मिळाली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला 28 टक्के मते मिळाली. या वेळी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त. भाजपची मते फक्त तीन टक्के वाढली. भाजपला मागच्या निवडणुकीत 37 टक्के मते मिळाली. या वेळी 41 टक्के. फक्त एक टक्क्याने भाजप सत्तेवर आला व मोदी विजयाचे लाडू खात आहेत. ही एक टक्का मते काँग्रेसकडून खेचण्यासाठी पैसा व सरकारी यंत्रणांचा वापर झाला. काँग्रेस याच रणनीतीत कमी पडली. एका पत्रकाराने त्याच्या हरयाणवी भाषेत सांगितले, ‘’हरयाणाची जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी वणवण करीत होती, पण काँग्रेसचा ’रवैया’ जणू असा होता की, ’रहण दे ताऊ, ताई! थारा भोट तू ही रक्ख!” आपला विजयरथ कोण रोखणार? याच भ्रमात काँग्रेस राहिली. हरयाणातील काँग्रेसचा पराभव हा देशात अहंकार, हुकूमशाहीविरोधी लढणाऱ्या सर्वच घटकांचा पराभव. हरयाणात काँग्रेस जिंकली असती तर दिल्ली सरकारच्या पाठिंब्याचा खांब नक्कीच हलला असता. म्हणून मोदी जिंकले असे म्हणता येत नाही. जम्मू-कश्मीरात ते सपशेल हरले.
मंत्री हरले
हरयाणात भाजपचे बहुतेक सर्व प्रमुख मंत्री पराभूत झाले, पण पक्ष जिंकला. हरयाणा निकालांचा महत्त्वाचा संदेश असा की, ’सर्व्हे’ व ’एक्झिट पोल’ कुचकामी आहेत. हरयाणा निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असे भाजप व त्याच्या मित्रपक्षांना वाटते. हरयाणात भाजपने विजयासाठी जे तंत्र वापरले तेच महाराष्ट्रात वापरायचे. पैसा, जातीनिहाय उमेदवार प्रत्येक मतदारसंघात फेकून महाविकास आघाडीची घोडदौड रोखायची असे धोरण आहे. पण हे तंत्र महाराष्ट्रात चालणार नाही. हरयाणा विजयाचा ’एकटक्की’ धुरळा आता खाली बसला. कारण मोदी-शहा-भाजपचा कोणताच विजय खरा नसतो हे लोकांना समजले आहे. हरयाणातील भाजप विजयाची ’ठेच’ महाराष्ट्राला शहाणे करणारी आहे.
”रहण दे ताऊ, ताई!
थारा भोट तू ही रक्ख!”
असा अहंकार महाराष्ट्रात कोणी दाखवणार नाही.
महाराष्ट्रात पुन्हा बेइमानांचे राज्य येणार नाही हे मात्र नक्की!
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]