गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा श्वास आणि ध्यास बनून राहिलेला शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवतीर्थावर मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात होणार आहे. हा केवळ शिवसेनेचा मेळावा नाही, तर महाराष्ट्राच्या तेजस्वी परंपरेचा सोहळा आहे. महाराष्ट्राला झुकवण्याची दिवास्वप्ने पाहणारे दिल्लीश्वर आणि त्यांच्या इशाऱ्यासमोर मान तुकवणारे महाराष्ट्रातील गद्दार यांच्यावर या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडणार आहे. लाखोंच्या साक्षीने उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करणार आहेत. अतिविराट जनसमुदायासमोर आगामी विधानसभा निवडणुकीचा शंखनाद घुमणार आहे. शिवसेनेच्या धगधगत्या मशालीचे चटके कोणाला बसणार याकडे अवघ्या हिंदुस्थानसह देशविदेशातील प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे. या ऐतिहासिक सोहळय़ात विचारांचे सोने लुटण्यासाठी वाजतगाजत, गुलाल उधळत या, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील विचारांनी तमाम हिंदूंमध्ये राष्ट्राभिमान जागवला. मराठी माणसाच्या मनगटात स्वाभिमानाचे बळ दिले. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दसरा मेळावा निश्चितच विराट आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेने टिझरचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक तीन टिझर लाँच केले आहेत. शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शिवसेना काय करू शकते हे दाखवून देईन, असा इशारा या टिझरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हीच आक्रमकता अनेक पटीने उद्या दसरा मेळाव्यात दिसणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटातही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे उद्या कोणावर शरसंधान साधणार, कोणाचा वेध घेणार याचे कयास त्यांच्याकडून बांधले जात आहेत.
भगवा रंग फिका पडू देऊ नका…
शिवसेनेच्या एका टिझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही, कुठेही फिका पडू देऊ नका, असे आवाहन शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींना करताना दिसत आहेत. दिल्लीश्वरांचा महाराष्ट्रद्वेष ठेचून काढण्यासाठी, गद्दार वृत्ती गाडण्यासाठी, महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी, महाराष्ट्रद्वेष्टय़ांचा खरपूस समाचार घेण्यासाठी महाराष्ट्राचा एकमेव पारंपरिक दसरा मेळावा असा उल्लेख टिझरमध्ये करण्यात आला आहे.
शस्त्रपूजा, सोनेवाटप आणि रावण दहन
शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा बनला आहे. या मेळाव्यात शिवतीर्थावर परंपरेनुसार शस्त्रपूजा, सोनेवाटप आणि रावण दहन केले जाणार आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, 60 अधिकारी व जवळपास 300 कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.