आसामच्या धुबरी जिल्ह्यामध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका भरधाव एसयुव्हीने चार मुलांना चिरडले. या दुर्घटनेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलाचा रुग्णालयात घेऊन जाता असाताना मृत्यू झाला.
पोलीस अधिकारी नवीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास चार मुले गोलकगंज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर त्यांच्या घराच्या समोर खेळत होती. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या एसयुवीने मुलांना चिरडले. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे या धडकेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलाचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतचं मृत्यू झाला.
सदर घटनेमुळे मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मरियन खातून, जौई रहमान, अबू रहमान आणि मेहंदी हुसेन अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.