मुसळधार पाऊस मुंबईच्या पथ्यावर, तापमान झाले कमी; हवेची गुणवत्ताही सुधारली

गेल्या दोन तीन दिवसांत मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पण हा पाऊस मुंबईच्या पथ्यावर पडला आहे. मुंबईचे तापमान काही अंशी कमी झाले आहे. तर हवेचा गुणवत्ताही सुधारला आहे.

ऑक्टोबर उजाडला तरी मुंबईतला पाऊस गेलेला नाही. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर अनेक ठिकाणी लोकल उशिराने धावत होत्या. नवरात्रीचे दिवस असल्याने गरब्याच्या ठिकाणी पाऊस पडला आणि अनेकांचा हिरमोड झाला. असे असले तरी यामुळे मुंबई आणि ठाण्याला फायदाच झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर आणि ठाणेकर ऑक्टोबर हिटला वैतागले होते. रिमझिम पाऊस पडल्याने नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता खालावली होती. पाऊस पडल्याने हवेची गुणवत्ता सुधारली आहे.