अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही महायुती सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा टोला

राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांकडे लक्ष ठेवत गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहे. तिजोरीत खडखडाट असताना महायुती सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे. गेल्या 10 दिवसांत तब्बल 1200 पेक्षा जास्त शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. विरोधकांनी या निर्णयांवर कठोर शब्दांमध्ये हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे. महायुती सरकारला पराभवाची खात्री झाल्यानेच बुडत्याला काडीचा आधार म्हणून सरकार वेगवेगळ्या घोषणा करत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

आगामीयेत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांतील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटांत घेतले गेलेले ८६ निर्णय त्रिकुट सरकारची अगतिकता दर्शवत आहे, असे जयंत पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या दहाच मिनिटात उठून निघून गेले. डबघाईला आलेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची होत असलेली वाताहात बघून दिल्लीतील गुजरातचे नेते मात्र नक्कीच मनोमन खूष झाले असतील!असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.