तेव्हा राज्यमातेला सापत्न वागणूक दिली, रोहित पवारांची जोरदार टीका

महायुती सरकारने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. पण जेव्हा ही राज्यमाता संकटात होती तेव्हा सरकारने तिला सापत्न वागणूक दिली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. तसेच जेव्हा राज्यमाता लंपीच्या विळख्यात होती तेव्हा सरकारने लस दिली नाही असेही पवार म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, हीच ती राज्यमाता दुष्काळात चारा-पाणी नसल्याने सरकारला चारा छावण्या सुरू कण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु सरकारने उन्हाळा संपला तरी छावण्या सुरू केल्या नाहीत आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर छावणी सुरू केली तीही केवळ एकच ठिकाणी . हीच ती राज्यमाता लंपीच्या विळख्यात अडकली असताना उपचाराची, लसीकरणाची वाट बघत होती, पण सरकार या गोमातेपर्यंत वेळेत पोचलंच नाही…
हीच ती राज्यामाता, जेंव्हा संकटात होती तेंव्हा सरकारने सापत्न वागणूक दिली आणि आता निवडणूक येताच या सरकारला राज्यमातेच्या प्रेमाचा पान्हा फुटला.. गोमातेप्रती हीच का तुमची श्रद्धा? हे तुमचं ढोंगी प्रेम आणि खोटी श्रद्धा जनतेने ओळखली असून, येणाऱ्या निवडणुकीत जनता पद्धतशीरपणे या सरकारचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही! असेही रोहित पवार म्हणाले.