महायुतीतील गट एकमेकांच्या छाताडावर बसले आहेत, त्यांच्यात काय आलबेल असणार ; संजय राऊत यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आता कधीही निवडणुका होऊ द्या, आम्ही तयार आहोत, असा विश्वासही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी महायुती आणि भाजपवर हल्ला चढवला.

घटनाबाह्य महायुती सरकारमध्ये कधीही आलबेल नव्हते. फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी तसेच महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हे अघटित सरकार सत्तेवर आले. ते स्थापन झाल्यापासून त्यांच्यात आलबेल कधीही नाही. ते एकमेंकांसोबत हाणामाऱ्या करत आहेत. तसेच फडणवीस यांना कोणीही विचारत नाही, अशी त्यांची राजाकरणात स्थिती झाली आहे. मुख्यमंत्री सर्वात जास्त खोके दिल्लीला पोहचवत असल्याने अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेले दिसत आहे, मात्र, हे प्रेम नसून अफेअर आहे, तसेच ते कधीही तुटू शकते, असा टोलाही त्यांनी लगावला.

लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये सांगतात. ही योजना राजकीयदृष्या प्रेरीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे झाखंडला एक न्याय आणि महाराष्ट्राला दुसरा न्याय, असे होऊ शकत नाही, त्यामुळे ही योजना राजकीयदृष्या प्रेरीत असल्याचे पंतप्रधान सांगत असतील, तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असेही सजंय राऊत म्हणाले.

महायुती सरकार खादाड आहे. प्रत्येक कामात त्यांचे 40 टक्के कमीशन आहे. इतर राज्यातील खर्चही मिंध्यांना करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठीच हे बेकायदा सरकार सत्तेत आले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केले. भाजप हरयाणाच्या निवडणुकीत कसा जिंकला, यावर त्यांनी पुस्तक काढावे, असा टोलाही त्यांनी लगावला. फक्त 0.6 टक्के जास्त जागा मिळाल्याने भाजपच्या 30 जागा कशी वाढल्या, हा मोठा प्रश्न आहे, जनतेने आता याचा विचार करावा, असेही संजय राऊत म्हणाले.