महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमल मधुकर पिचड या आदिवासी नसतानाही त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनवून त्याआधारे त्यांच्या सून सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ख्यातनाम वकील असीम सरोदे यांच्यामार्फत सरोज पिचड यांनी माजी मंत्री पिचड यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
यासंदर्भात एक प्रेसनोट प्रसिद्धीस देण्यात आली असून, त्यात म्हटले आहे की, दुसरी पत्नी कमल पिचड या हिंदू-मराठा असताना मधुकर पिचड यांनी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. त्याच वेळी सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या बळजबरीने अनेक कागदपत्रांवर सह्या घेतल्या. स्वतःच्या ओळखींचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून घेतले. बनावट आदिवासी दाखल्याच्या आधारे कमल पिचड यांच्या नावाने जमिनी फेरफार करून घेतल्या. त्या सर्व जमिनी व मिळकती समृद्धी महामार्गात विक्री करून त्याद्वारे शासनाकडून साधारणतः पाच कोटी रुपये घेतले आहेत. हे पैसे त्यांची सून सरोज पिचड यांना मिळणे आवश्यक होते. तसेच त्याव्यतिरिक्त अन्य शेतकऱयांच्यादेखील मिळकती अशाच प्रकारे बेकायदेशीर बळकावून त्यातूनही पिचड यांनी करोडो रुपये मिळविले आहेत. त्याबाबत सहआयुक्त अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे 2018 सालापासून तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारी अधिकारी मधुकर पिचड यांच्या दबावाखाली वागतात. त्यामुळे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप पेसनोटमध्ये करण्यात आला आहे.
या सर्वांबाबत सरोज जितेंद्र पिचड यांनी पोलीस निरीक्षक शहापूर यांच्याकडे तक्रार करूनही पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण येथे प्रायव्हेट तक्रार दाखल केलेली आहे. सदरकामी कोर्टाने दखल घेऊन मधुकर पिचड, कमल पिचड व संबंधितावर कारवाई का केली जाऊ नये, याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत 25 तारखेला सुनावणी होणार आहे. कमल पिचड यांनी आदिवासी नसताना आदिवासी जमिनी बेकायदेशीर बळकवून त्यातून करोडोंचा नफा मिळविला आहे. त्यास मधुकर पिचड यांचे राजकीय पाठबळ असून, ते सध्या सत्ताधारी भाजप गटामध्ये असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. याप्रकरणी न्याय मिळेल याची खात्री सरोज पिचड यांना आहे. मधुकर पिचड व इतरांविरोधात त्यांची सून सरोज पिचड यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसारसुद्धा केस दाखल केलेली आहे