मोबाईलच्या अमिषाने सांगलीत बालिकेवर अत्याचार

शहरातील एका परिसरात राहणाऱ्या नऊ वर्षांच्या बालिकेला मोबाइल दाखवण्याचे आमिष दाखवून तिला पडक्या सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडितेच्या नातवाईकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित सराईत गुन्हेगार ईश्वर महादेव कांबळे (वय 26, रा. संजयनगर) याला अटक केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, संतप्त जमावाने घटनास्थळाची मोडतोड केली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नराधम ईश्वर कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो संजयनगर परिसरात राहतो. पीडित नऊ वर्षांची मुलगी मंगळवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. यावेळी कांबळे तिच्याजवळ गेला. तिला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून एका पडक्या सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला. तो पीडितेला घेऊन जात असल्याचे एका व्यक्तीने बघितले होते. त्या व्यक्तीने इतरांना बरोबर घेऊन धाव घेतली असता, कांबळे तेथून पळून गेला. पीडित मुलगीही तिच्या घरी गेली. यावेळी संबंधिताने घडलेला प्रकार पीडितेच्या पालकांना सांगितला. यावेळी आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, कांबळे याने अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. यानंतर पीडितेच्या आईने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी संशयित कांबळे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांचे ठिय्या आंदोलन

z चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संजयनगर परिसरात संतापाची लाट उसळली होती. जेथे गुन्हा घडला तेथे मोठा जमाव जमला. जमावाने बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाची मोडतोड करत कठोर कारवाईसाठी रस्त्यावरच ठिय्या मारला. यावेळी पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी धाव घेत नागरिकांशी संवाद साधत कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, अत्याचाराची घटना घडली, त्याच परिसरात गांजाची झाडे नागरिकांना मिळाली. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.