कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या काळात कोविडमध्ये सात हजार 223 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. ता काँग्रेस सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या घोटाळ्यावर एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड काळात अनेक वैद्यकीय उपकरणं घेण्यात आली त्यात मास्क, औषधं, ऑक्सिजन सिलिंडर आणि पीपीई किट घेताना सरकारकडून कुठलीच परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या काळात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्यांतही फेरफार केल्याचा आरोप आहे.
या एसआयटीसोबत आणखी एक उपसमिती नेमण्यात आली आहे. त्यात या उपकरणांच्या किंमतीबद्दल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही उपकरणं विकत घेण्याचे आदेश दिले त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यात ज्या कंपन्या दोषी आढळल्या जातील त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल असे सरकारने म्हटले आहे.