हरयाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एका माजी आमदाराने संताप व्यक्त केला आहे. या आमदाराने मुलींसाठी सुरू केलेली मोफत बस सेवा चक्क बंद केली आहे. बलराज कुंडू असे त्यांचे नाव असून त्यांनी रोहतक जिल्ह्यातील मेहम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.मात्र त्यात त्याचा पराभव झाला
बलराज कुंडू यांनी 2019 साली मेहम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक जिंकली होती, मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संतापलेल्या बलराज कुंडू यांनी पराभवानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत कुंडू यांच्या समर्थकांनी सांगितले की, मोफत बस सेवा सुरु करुन देखील त्यांच्या नेत्याला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विद्यार्थीनींसाठी शाळा-कॉलेज, विद्यापिठात जाण्यासाठी मोफत बससेवा सुरु केली ती बंद करावी अशी मागणी केली.
बलराज कुंडू हे त्यांच्या समाजसेवेसाठी ओळखले जातात. त्यांनी महम येथे शाळा-कॉलेजांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थीनींसाठी मोफत 18 बस सुरू केल्या होत्या.मी सुरू केलेली मोफत बससेवा याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध ना्ही. निवडणुकीत पराभव झाल्याने आपण हा निर्णय घेतलेला नसून समर्थकांच्या मागणीमुळे मोफत बससेवा बंद केल्याचे कुंडू यांनी सांगितले आहे.
बसेस बंद झाल्यामुळे विद्यार्थिनींना शाळा-कॉलेजात जाण्यासाठी त्रास होणार आहे. आता त्यांच्यासाठी हरयाणा रोडवेजच्या बसने, खाजगी बसने किंवा ऑटोने जाण्याचा एकमेव पर्याय उरला आहे . त्यामुळे मेहम आणि आसपासच्या गावांमधून रोहतकमध्ये शाळा-कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.