पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतानमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने 823 धावांचा भलामोठा डोंगर पाकिस्तानसमोर उभा केला आहे. या सोबतच इंग्लंडने 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
मुलतानमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 विकेट गमावत 823 धावा केल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरशः धुवून काढले. हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावत विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. हॅरीने 310 चेंडूंमध्ये कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला. त्याचबरोबर जो रुटने धमाकेदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले आणि 262 धावा करून तो बाद झाला. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 7 गड्यांच्या मोबदल्यात 823 धावा केल्या आणि पहिला डाव घोषित केला.
इंग्लंडने केलेल्या 823 धावांमुळे 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला आहे. यापूर्वी 1958 मध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध किंग्स्टन येथे 3 विकेट गमावत 790 धावा करत डाव घोषित केला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विक्रम आता इंग्लंडने मोडला आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात तब्बल तीन वेळा 800 पेक्षा अधिक धावा करणारा इंग्लंड एकमेव आणि पहिला संघ ठरला आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 900 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी 1997 साली टीम इंडियाविरुद्ध 6 गड्यांच्या मोबदल्यात 952 धावा केल्या होत्या. याबाबतीत दुसऱ्या नंबरला इंग्लंडचा संघ आहे. त्यांनी 1938 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेट गमावत 903 धावा केल्या होत्या.