समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील सावंगी शिवारात अफूच्या बोंडांची विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार, 9 रोजी अटक केली. त्याच्याकडून पोत्यामध्ये भरलेली 87 किलो अफूची बोंडे आणि कार असा सुमारे 31 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ओमप्रकाश भागीरथराम बिष्णोई (24, रा. नगर, ता. गुडामालाणी, जि. बाडमेर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (एमएच 21-बीएच-5977) अफूची बोंड विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावंगी शिवारात सापळा रचून आरोपी ओमप्रकाश विष्णोई याला पकडले. कारची झडती घतेली असता सहा पोत्यांमध्ये 25 हजार रुपये किलोप्रमाणे अफूची 78 किलो 100 ग्रॅम बोंड आणि कार असा सुमारे 31लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, सहायक निरीक्षक सुधीर मोटे, पवन इंगळे, उपनिरीक्षक दगडू जाधव, सहायक फौजदार भागीनाथ वाघ, हवालदार नामदेव सिरसाट, संतोष पाटील, सुनील खरात, श्रीमंत भालेराव, विठ्ठल डोके, वाल्मीक निकम, गोपाल पाटील, अंगद तिडके, नरेंद्र खंदारे, दीपक सुरोशे, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनंत घाटेश्वर, चंदेले, संतोष डामाळे आदींनी केली.