टाटांसाठी देश लुटण्याचं नाही तर निर्मितीचं साधन होतं! संजय राऊत यांची प्रतिक्रिया

उद्योगमहर्षी, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे जगभरातील उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत टाटांसाठी देश लुटण्याचे नाही तर निर्मितीचे साधन होते, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्योगपतींच्या निधनानंतर कुणी हळहळत नाही, पण टाटा हे असे व्यक्तीमत्व होते की ते देशातल्या घराघरात पोहोचलेले नाव होते. ते गेल्याने देश हळहळतोय. याचे कारण असे आहे की टाटांनी आपल्याला भरपूर दिले आहे.

उद्योगपतीला नफा आणि तोटा हे दोनच शब्द माहिती असतात, जे आपण पाहत आहोत. पण टाटा हे कमालीचे देशभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, सामाजिक कार्यातील आणि मुंबईसारखे शहर घडवण्यातील त्यांच्या योगदानाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. टाटांसाठी देश लुटण्याचे साधन नव्हते, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांचे वर्णन केले.

आज उद्योगपतींसाठी देश हा लुटण्याचा खजिना आहे. पण टाटांसाठी देश हे निर्मितेचे साधन होते. त्यांनी देश घडवला, त्यांनी आम्हाला, तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली. उद्योगक्षेत्रात सचोटी, सत्य आणि प्रामाणिकपणा हे ब्रिद जर कुणाच्या नावात चिकटले असेल तर ते टाटा यांच्या. उद्योगपती असतानाही प्रत्येकाला ते आपल्या घरातील एक व्यक्ती वाटत राहिले. जगामध्ये असे दुसरे उदाहरण नाही, असेही राऊत म्हणाले.

टाटा आणि देशातील जनतेचे नाते ममतेचे होते. टाटांनी कोरोना काळामध्ये आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहिती आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यात मोठी देणगी, हजारो कोटी रुपये देणारे टाटा होते. टाटांनी फक्त माणसांची इस्पितळं निर्माण केली नाहीत, तर प्राणी, पक्षी, अनाथांसाठीही आपला खजिना रिकामा केला. टाटा गेले याच्यावर अद्याप विश्वास बसत नाही. ते आमच्या हृदयात कायम राहतील, असेही राऊत म्हणाले.