परतीच्या पावसाचा तडाखा; उभी पिके चिखलात आडवी

अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे शेकडो एकरातील उभी पिके चिखलात आडवी झाली आहेत. कापून ठेवलेल्या भाताची तर अक्षरशः माती झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा आक्रोश करत आहे. मात्र हा आक्रोश मिंधे सरकार मनावर घ्यायला तयार नाही. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याऐवजी सरकार राजकारण आणि विविध फसव्या योजनांद्वारे स्वतःची प्रतिमा उजळून घेण्यात मश्गूल असल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वीटभट्टींना प्लास्टिकचा आधार

खर्डी, अजनुप, कसारा, शहापूर व किन्हवली परिसरात कापून ठेवलेला भात सुरक्षित ठिकाणी हलवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी भाताच्या लोंब्यांची नासाडी होऊ नये म्हणून त्यावर प्लास्टिक अंथरण्यात आले आहे, तर वीटभट्टींनाही प्लास्टिकचा आधार दिला जात आहे.

ठाण्यात ढगांचा गडगडाट

ऑक्टोबर हीटने पहिल्याच आठवड्यात उच्चांक गाठलेला असताना ठाण्यात आज पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मात्र सर्वांची तारांबळ उडाली. पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने रास गरबा आणि दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला.