लाडक्या बहिणींची भरधाव बस 50 फूट दरीत कोसळली

पंधराशे रुपये हातावर टेकवून विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवणाऱ्या मिंधे सरकारचा अट्टहास आज रायगडातील चाळीस गोरगरीब महिलांच्या जीवावर बेतला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत माणगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी आणण्यात येणाऱ्या लाडक्या बहिणींची भरधाव एसटी बस मांजरोणे घाटात 50 फूट दरीत कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने ही बस पलटी न होता उतारावरून सरळ जाऊन एका झाडाला अडकली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात तीन महिला अक्षरशः रक्तबंबाळ झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आश्वासनांचे बुडबुडे आणि वर्तमानपत्रे, चॅनलवरून कोट्यवधींच्या जाहिराती देऊनदेखील लोकसभा निवडणुकीत भाजप व मिंधेंना मतदारांनी जोरदार तडाखा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपटी बारला सामोरे जायला लागणार असल्याने तिजोरीत खडखडाट असताना खोके सरकारने लाडकी बहीणसह अन्य योजना जाहीर केल्या आहेत. आता या योजनेचे श्रेय लाटण्याचा सपाटा भाजप, मिंधे गटाने लावला असून राज्यभरात सरकारी पैशात स्वतःचे मार्केटिंग करण्यास सुरुवात केली आहे. माणगावमध्येदेखील आज मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खचाखच गर्दी व्हावी याकरिता प्रशासनाला टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार गावागावातून एसटी बसेस भरून बचत गटाच्या महिलांना कार्यक्रमस्थळी आणले गेले.

माणगाव तालुक्यातील रानवडे या गावातूनदेखील 40 महिलांना घेऊन लालपरी माणगावच्या दिशेने निघाली होती. दुपारी 12.45 वाजता ही बस मांजरोणे घाटात आली असता अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ही भरधाव बस थेट 50 फूट दरीत कोसळली.

किंकाळ्यांनी घाट हादरला

घाटातील एका वळणावर मोठा झटका बसून ही बस दरीत कोसळली. त्यामुळे जीवाच्या आकांताने सर्व महिलांनी किंकाळ्या फोडल्या. धाय मोकलून रडणाऱ्या या माऊलींनी देवाचा धावा केला. सुदैवाने सरळ उतारावरून ही बस घरंगळत एका झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र तीन महिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गावकरी मदतीला धावले

अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मांजरोणे घाट परिसरातील गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. एसटीत अडकलेल्या महिलांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पुणे येथून महिलांना एसटीमधून भरून आणण्यात आले होते.