नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे पेणवासीयांना गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः मातीमिश्रित अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करीत असल्याने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला फैलावर धरले. नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, तत्काळ जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करा, असे खडेबोल सुनावतानाच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
पेण शहरातील गोळीबार मैदानावर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या केंद्राची पुरती वाट लागली असून येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केंद्राचे लोखंडी गेट चोरीला गेले आहे. पाण्याच्या टाक्यांवर कोणत्याही प्रकारची झाकणे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात उंदीर, घुस, भटकी कुत्री, मांजरे त्यात पडून मरतात, अशा तक्रारी अनेकदा नागरिकांनी केल्या आहेत. परंतु याकडे कानाडोळा करून कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नागरिकांना पुरवले जाते. याची गंभीर दखल घेत शिवसेनेचे शहरप्रमुख सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पेण नगर परिषदेवर धडक देण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांसह जलशुद्धीकरण केंद्राची पाहणीदेखील करण्यात आली.
पंधरा दिवसांत उपाययोजना करणार
शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले. मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पाची सफाई हाती घेतानाच शुद्ध पाणीपुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन गेट, सीसीटीव्ही कॅमेरे व चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचेदेखील मान्य केले.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक दीपाश्री पोटफोडे, शहरप्रमुख सुहास पाटील, विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, वाहतूक सेनेचे दिलीप पाटील, बाळू पाटील, जीवन पाटील, योगेश पाटील, शिवाजी म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, नाम शिंदे, नामदेव पिंगलस्कर, असदअली आखबरे, विजय पाटील, कमलाकर मोकल, महिला आघाडीच्या मेघना चव्हाण, वैशाली समेळ, हिना कागझी, सुधाकर म्हात्रे, कांचन थळे, किर्तीकुमार कळस, राकेश पाटील, प्रीतम नार्वेकर, ललित सावंत, दिलीप बामणे, नशिकांत म्हात्रे, प्रदीप वर्तक, कमलाकर मोकल, नरेश भालेराव यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.