कल्याणची जागृत जरीमरी देवी

ऐतिहासिक कल्याणनगरीत अनेक जुन्या शिवकालीन वास्तू व देवस्थाने आज ही पाहण्यास मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जरीमरी देवीचे मंदिर 250 ते 300 वर्षे जुने असून नवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजूस जरीमरी देवीच्या दोन दगडी मूर्ती विराजमान असून भक्तीचा सुगंध दरवळला आहे.

हे जागृत देवस्थान म्हणून जरीमरी माता प्रसिद्ध आहे. मंदिर पूर्वी कौलारू छपराचे होते. मंदिराचे संस्थापक व व्यवस्थापन कल्याणच्या ठाणकर पाड्यावरील ठाणकर परिवार यांच्याकडे असल्याने त्यांनी 35- 40 वर्षांपूर्वी मंदिराचे नवीन बांधकाम केले आहे. नवरात्रीचे दहा दिवस व आषाढ महिना या काळात मोठा उत्सव असतो. चैत्र शुद्ध हनुमान जयंतीच्या दिवशी जरीमरी देवीची संध्याकाळी वाजतगाजत मोठ्या जल्लोषात पालखी निघते. पालखी मंदिरापासून सुरू होऊन कल्याण शहरातील मुख्य चौक व बाजारपेठेतून पुन्हा मंदिरात होते. या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात.

नवरात्रोत्सवात देवीला नऊ रंगाच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान केल्या जातात. यावर्षीदेखील देवीची सुंदर सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात भाविकांना देवीचे दर्शन होते. मंदिराचे संस्थापक ठाणकर परिवार पिढ्यान्पिढ्या व्यवस्थापनाची जोपासना उत्तम प्रकारे करत आहे. नवरात्रीनिमित्त हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी कल्याणसह अनेक भागांतून दर्शनासाठी येतात.