‘नको बारामती… नको भानामती…’ म्हणणारे लांडगे अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसले

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण शहरात ‘नको बारामती… नको भानामती… शहराची सत्ता देऊ आपल्या राम-लक्ष्मणाच्या हाती…’ अशा आशयाचे फलक भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लावून बारामतीकर अजितदादांना टार्गेट केले होते. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत लांडगे यांनी अजितदादांबरोबर कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येण्याचे टाळल्याचे वारंवार दिसून आले. परंतु आज महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात अजितदादांच्या मांडीला मांडी लावून आमदार लांडगे बसल्याचे दिसून आले. त्यामुळे लांडगे यांनी पवारांबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता; परंतु 2014च्या विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकांत अजितदादांच्या बालेकिल्ल्याला जबर तडा गेला. पिंपरीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव झाला. 2017च्या महापालिका निवडणुकीत कै. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी भाजपची एकहाती सत्ता आणून पवारांचा बालेकिल्ला काबीज केला. त्यांनी लावलेल्या या आक्रमक फलकांमुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती; परंतु लांडगे हे भाजपबरोबर त्यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस करीत नव्हता. त्यामुळेच महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे वारंवार बोलले जात आहे.

अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजपच्या राजवटीत महापालिकेत झालेल्या विविध कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आमदार लांडगे यांना टार्गेट करण्यासाठीच अजित पवारांनी खेळी खेळल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. अजित पवार महायुतीच्या सत्तेत सहभागी होऊनही आमदार लांडगे हे त्यांच्यापासून दोन हात लांब राहत होते.

मी राजकीय भूमिका शरद पवार यांना सांगूनच घेतली, पण… – अजित पवार

पूर्वी भोसरीतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांत विविध विकासकामांची उद्घाटने लोकसभेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाली होती. भोसरीतील विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणले होते; परंतु आता राजकीय समीकरणे बदल्यामुळे आमदार लांडगे यांना निवडणूक सोपी राहिली नाही. त्यामुळेच त्यांनी उद्घाटने, भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून समेट घडविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.