रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. रतन टाटा यांच्याकडे वयाच्या 21 व्या वर्षी ऑटोमोबाइल क्षेत्रापासून स्टीलपर्यंत विविध क्षेत्रात विस्तारलेल्या टाटा समूहाचे अध्यक्षपद आले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात टाटा समूहाने नवी उंची गाठली. 2012 पर्यंत त्यांनी हे अध्यक्षपद भूषवले. उद्योगासोबतच समाजकार्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. 1996 मध्ये टाटा यांनी टेलिसर्व्हिसेस या टेलिकॉम कंपनीची स्थापना केली. तर 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मार्पेटमध्ये आणले. रतन टाटा यांना 2006 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ तर 2008 मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने जागतिक स्तरावर कंपनीचा विस्तार केला. त्यांनी टेटली ही चहा कंपनी, स्टील कंपनी कोरस आणि जग्वार-लॅण्ड रोव्हरसारख्या प्रमुख पंपन्यांचे अधिग्रहण केले. त्यामुळे टाटा समूह जागतिक पावरहाऊस म्हणून उदयाला आले. टाटा म्हणजे विश्वास, अशी टाटा समूहाची ओळख रतन टाटांनीच निर्माण केली.
शिक्षण
मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल तसेच न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. 1955 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर कार्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. येथून त्यांनी 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली.
दानशूर उद्योगपती
n रतन टाटा हे केवळ उद्योगपतीच नव्हते तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ते ओळखले जात.
n आपल्या संपत्तीतील मोठा हिस्सा (60 टक्क्यांपेक्षा जास्त) सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सेवेसाठी त्यांनी दान केला.
n 1919 मध्ये टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये (आताचे सुमार 75 कोटी रुपये) दान करण्यात आले.
n रतन टाटा यांनी आपल्या कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वसा पुढे ठेवला आणि अनेक संस्थांना सढळ हाताने मदत केली.
n देशातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल मुंबईत उभारले. बार्शीसारख्या लहान गावातही हॉस्पिटलची उभारणी केली.
n मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे उभारणी त्यांनी केली. मुंबई आयआयटीला तब्बल 950 दशलक्ष रुपये दान केले. हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस अशा अनेक संस्थांच्या उभारणीत टाटा यांचा मोटा वाटा आहे.
n अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, कॉरनील विद्यापीठ, हार्वर्ड बिझनेस स्कूल ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठ अश अनेक नामवंत शिक्षण संस्थांना रतन टाटा यांनी सढळ हाताने मदत केली.
दहशतवादी हल्ल्यावेळी खंबीर आधार दिला
n रतन टाटा हे हिंदुस्थानातील सर्वांत आदरणीय, संवेदनशील उद्योगपती होते. अबालवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांत लोकप्रिय उद्योगपती म्हणून त्यांची जगभरात ओळख होती. मुंबईवर 26/11 ला भयंकर दहशतवादी हल्ला झाला. टाटा यांच्या हॉटेल ताजला दहशतवाद्यांनी टार्गेट केले. ताजमधील काही कर्मचाऱ्यांचा यात मृत्यू झाला. रतन टाटा यांनी या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भरभरून मदत केली. त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला.
कोरोनाकाळात दीड हजार कोटींचे दान
n कोरोना महामारीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. या कठीण काळात रतन टाटा यांनी दीड हजार कोटी रुपये दान केले. कोरोना काळात सवार्धिक आर्थिक मदत करणारे रतन टाटा होते.
चार वेळा प्रेमात पडले, पण…
n रतन टाटा अविवाहित राहिले. खुद्द रतन टाटा यांनीच एका मुलाखतीत त्याचं गुपीत सांगितले. ते म्हणाले, मी चार वेळा प्रेमात पडलो पण लग्न होऊ शकले नाही. अमेरिकेत वास्तव्यास असताना प्रेमात पडले पण अचानक कुटुंबात घडलेल्या आपत्तीमुळे त्यांना भारतात परतावे लागले. मुलीच्या घरच्यांनी तिला भारतात जाऊ दिले नाही. त्यानंतर रतन टाटा यांनी लग्नाचा विचार सोडला आणि ते अविवाहित राहिले.
भटक्या श्वानांचाही होता लळा
रतन टाटा हे श्वानप्रेमी होते. रस्त्यावरील श्वानांनाही ते प्रचंड जीव लावायचे. ताज हॉटेलच्या परिसरात येण्यापासून श्वानांना रोखले जात नसे. एखादे भटके श्वान ताज हॉटेलच्या परिसरात आले तर त्याला हटकू नका, त्याला चांगली ट्रीटमेंट द्या असे निर्देश रतन टाटा यांनी दिले होते. याबाबत एकाने काही वर्षांपुर्वी ट्वीटही केले होते. काही वर्षांपुर्वी रतन टाटा यांनी आपला जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रतन टाटा आणि त्यांच्या बंधूने आपल्या पाळीव श्वानाला सायकलवर बसवल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो 1945 असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
सर्वसामान्यांच्या कुटुंबांसाठी बनवली नॅनो कार
रतन टाटा यांच्या ‘सुमो’ आणि ‘इंडिका’ या कारला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना पावसात बाईकवरून जाताना पाहिलं हेच पाहून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आणि सुरक्षित अशी गाडी बनवण्याचा विचार रतन टाटा यांच्या मनात आला आणि देशाला पहिली स्वस्त कार मिळाली. 2008 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये प्रथमच जगाने टाटा नॅनोची झलक पाहिली. याकडे पीपल्स कार म्हणून पाहिले जायचे. रतन टाटांच्या या स्वप्नाशी देशातील एक मोठा वर्ग स्वत:ला जोडून पाहू लागला होता. अवघी लाखभर किंमत असलेली ही कार खरेदी करण्यासाठी शोरूमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
आदरांजली
उद्योगासोबत राष्ट्रउभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे, उत्तम नैतिकता असणारे व्यक्तिमत्व हरपले. पद्मविभूषण आणि पद्म पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रतन टाटा यांनी टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले. विद्यार्थ्यांसाठी तसेच उद्योगजगतासाठी ते आदर्श राहिले. समाजकार्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे.
n द्रौपदी मुर्मू, राष्ट्रापती
रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू व्यक्ती आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठत व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. याव्यतिरिक्त, त्याचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजात सुधारणा करण्याची अटळ बांधिलकी यामुळे ते अनेकांना प्रिय झाले.
n नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणिवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
n शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
रतन टाटा यांच्या जाण्याने केवळ हिंदुस्थाननेच नाही तर संपूर्ण मानवतेने एक दयाळू नेतृत्व गमावले आहे. ते परोपकारी उद्योजक होते. त्यांच्या व्यावसायिक आणि परोपकाराप्रती असणाऱ्या वचनबद्धतेसाठीच नाही तर प्राण्यांप्रती त्यांचा असणारा दयाळूपणा यांसाठीही ते कायम माझ्या स्मरणात राहतील. ज्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळच्या प्रत्येक क्षणाला मी त्यांच्यातील नम्रपणाचा साक्षीदार होतो.
n आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख
रतन टाटा हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि टाटा समुदायाप्रती माझ्या संवेदना.
n राहुल गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते
रतन टाटा आता आपल्यात नाहीत हे मी स्वीकारू शकत नाही. देशाची अर्थव्यवस्था ऐतिहासिक भरारी घेण्याच्या तयारीत असून भारताला या टप्प्यावर नेण्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या घडीला त्यांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे ठरले असते. ते एक असो उद्योजक होते ज्यांच्यासाठी संपत्ती आणि यश या दोन्ही गोष्टी तोपर्यंतच महत्वाच्या होत्या जोपर्यंत जागतिक समुदायाची सेवा करता येईल. अलविदा आणि देवाची कृपादृष्टी राहो. तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. कारण लिजेंडचा कधीच मृत्यू होत नाही.
n आनंद महिंद्रा, उद्योजक