विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच लगेचच दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिह्यातील कोकरनागमधून दोन जवानांचे अपहरण केले होते. त्यापैकी एका जवानाचा मृतदेह कोकरनाग जंगलात शोधमोहीम सुरू असताना छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला. दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याचे दिसले. दुसरा जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. अपहरणानंतर रात्रभर बेपत्ता जवानाचा शोध सुरू होता. हिलाल अहमद भट असे मृतदेह सापडलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घटल्याचा मोदी सरकारचा दावा पुन्हा फोल ठरला आहे.
हिलाल भट हा चार वर्षांपूर्वी टेरिटोरियल आर्मीमध्ये रुजू झाला होता. जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली होती. त्यासाठी प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीतील दोन जवानांना अनंतनागमधील जंगल परिसरात गस्तीवर पाठवण्यात आले होते, मात्र त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केले. एक पळून येण्यात यशस्वी झाला. दहशतवाद्यांनी त्यालाही गोळी मारल्याने त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2020 मध्येही घडली होती अपहरणाची घटना
2020 मध्येही दहशतवाद्यांकडून एका सैनिकाचे अपहरण झाले होते. दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये प्रादेशिक लष्कराच्या एका सैनिकाचे अपहरण केले होते. अनेक दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर अपहरण झालेल्या सैनिकाचे कपडे कुटुंबाच्या घराजवळ सापडले होते. तब्बल वर्षभरानंतर त्या जवानाचा मृतदेह सापडला होता.
सीमेवर सतत शोधमोहीम
घुसखोरीची माहिती मिळाल्यानंर सुरक्षा दलांनी 4 ऑक्टोबरला शोधमोहीम सुरू केली होती. कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सीमेवर दहशतवाद्यांची घुसखोरी पाहता सुरक्षा दलांकडून सातत्याने शोधमोहीम राबवली जात आहे.