एक पक्ष… एक विचार… एकच मैदान ही परंपरा कायम राखत शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही शिवतीर्थावर मोठय़ा उत्साहात होणार आहे. दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लुटारू, मुजोरी वृत्तीमुळे महाराष्ट्रधर्म संकटात सापडला आहे. त्याच्या रक्षणासाठी शिवसेनेची मशाल धगधगली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ दसरा मेळाव्यात महाराष्ट्रद्रोह्यांवर धडाडणार आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दसरा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचे सोने शिवसैनिकांना दिले आणि शिवसेनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. करारी बाण्याची ती परंपरा पुढे चालवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला अधिक बळ दिले आहे. यंदाही दसरा मेळाव्यात वाघाची डरकाळी घुमणार आहे.
n सद्य राजकीय परिस्थिती, केंद्रातील भाजप आणि राज्यातील मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय संदेश देतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून या मेळाव्याला वाजतगाजत, गुलाल उधळत या, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने टिझरमध्ये करण्यात आले आहे.
n दसरा मेळाव्याचा पहिला टिझर शिवसेनेच्या वतीने रिलिज करण्यात आला आहे. महाराष्ट्र हितासाठी विजयादशमीला शिवतीर्थावर शिवगर्जना घुमणार आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी निष्ठावंतांची ताकद एकवटणार आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना भस्मसात करण्यासाठी शिवसेनेची मशाल धगधगणार आहे, अशी गर्जना या टिझरमधून करण्यात आली आहे.