हिंदुस्थानी महिला संघाने दसऱ्याआधीच लंकादहन करताना श्रीलंकेचा 82 धावांनी धुव्वा उडवला आणि महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सलग तिसऱ्या पराभवामुळे श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र हिंदुस्थानने या विजयासह ‘अ’ गटातून 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. वादळी नाबाद अर्धशतकी खेळी करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर या विजयाची शिल्पकार ठरली. आता अखेरच्या साखळी लढतीत हिंदुस्थानपुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
हिंदुस्थानी महिला संघाकडून मिळालेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 19.5 षटकांत केवळ 90 धावांत संपुष्टात आला. हिंदुस्थानच्या अरुंधती रेड्डी व आशा शोभना यांनी 3-3 फलंदाज बाद केले. रेणुका सिंगने 2, तर श्रेयंका पाटीलने एक बळी टिपला. त्याआधी, हिंदुस्थानने स्मृती मानधना (50) व शेफाली वर्मा (43) आणि हरमनप्रीत कौरच्या 27 चेंडूंतील तडाखेबंद आणि नाबाद 52 धावांमुळे 3 बाद 172 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती.