मिंध्यांची चमकोगिरी… सोशल मीडियावरील पाच दिवसाच्या प्रसिद्धीसाठी काढले 90 कोटींचे टेंडर

राज्यातील मिंधे भाजप सरकारने पाच दिवसांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले असून आणखी किती दिवस जनतेला लुटणार आहात? असा संतप्त सवाल केला आहे. मिंधे सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने हे टेंडर काढले आहे.

शिवसेनेने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत मिंधे सरकारला फटकारले आहे. ”जनतेच्या कराच्या पैशावर मिंधे- भाजप सरकारची उधळपट्टी सुरू आहे. 5 दिवसाच्या सोशल मीडिया चमकोगिरीसाठी काढले 90 कोटींचे टेंडर. हे लुटारू सरकार जनतेला आणखी किती लुटणार आहे? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

”लाडकी बहिणच्या एका एका कार्यक्रमासाठी सहा कोटींचे प्रयोजन असते. सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी 90 कोटींचे टेंडर काढले जात आहे. सरकारला फक्त शो बाजी करायची आहे, जाहिरातबाजी करायची आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची सरकारची इच्छा नाही. जनता त्यांना योग्य तो धडा देईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले.