महाराष्ट्रातही मतविभागणीचा ‘खेला’ करायचा व फाटाफूट घडवून निवडणुका जिंकायच्या हाच भाजप व त्यांच्या मिंध्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातही हरयाणाप्रमाणेच घडेल असे फडणवीस वगैरे लोक म्हणतात ते यासाठीच. पण मराठी माणूस मनाने लेचापेचा नाही. तो विचाराने पक्का आहे. हरयाणाच्या निकालाने जे निराश झाले त्यांनी जम्मू–कश्मीरच्या विजयाकडे आशेने पाहायला हवे. आम्ही हरयाणाप्रमाणे विजयी होऊ असे दावे करणाऱ्यांनी जम्मू–कश्मीरातील मोदी–शहांच्या पराभवाकडेही त्याच सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. भाजपच्या पिपाण्या कितीही वाजल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही!
हरयाणा विधानसभा निवडणुका जिंकल्याने भाजपात मोदींचा जयजयकार सुरू झाला, पण जम्मू-कश्मीरसारख्या राज्यात पंतप्रधान मोदी भाजपास विजयी करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपचे ढोंग उघड झाले आहे. हरयाणातील विजयाच्या जिलब्या खात असताना जम्मू-कश्मीरात माती खाण्याची वेळ का आली? याचे विश्लेषण भाजपच्या आंधळ्या पंडितांनी करणे गरजेचे आहे. हरयाणाचा निकाल महाराष्ट्रावर परिणाम करेल. हरयाणा जिंकला, आता महाराष्ट्र जिंकूच जिंकू, असा दावा भाजप व त्यांचा मिंधे गट करू लागला आहे. हरयाणा व महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीची तुलना करणे सर्वस्वी चुकीचे आहे. हरयाणातील गणितापेक्षा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे गणित वेगळे आहे. हरयाणा 90 सदस्यांची विधानसभा आहे. महाराष्ट्र 288 आमदारांचे व 48 खासदारांचे राज्य आहे. महाराष्ट्राला स्वतःचे मन व मत आहे. हरयाणात भाजप निवडणुका जिंकला हे सत्य आहे, पण सत्य मार्गाने त्यांनी हा जय प्राप्त केला काय? हा आता चर्चेचा विषय आहे. जम्मू-कश्मीरच्या पराभवाची चर्चा होत नाही, पण हरयाणा विजयाचे ढोल वाजवले जात आहेत. आता फडणवीस वगैरे ‘पिपाण्या’ वाजवत आहेत की, महाराष्ट्रात हरयाणाप्रमाणे होईल. मग काय हो फडणवीस, तुमच्या त्या हरयाणाचा विजय तूर्त ठेवा बाजूला. महाराष्ट्र जम्मू-कश्मीरप्रमाणेच निकाल देईल, असे तुम्ही-आम्ही का म्हणू नये? जम्मू-कश्मीरात इंडिया आघाडीचा विजय झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होईल. हरयाणात
जाट विरुद्ध सर्व बिगर जाट
असा सामना झाला. महाराष्ट्रात भाजपास असेच जातीय गणित मांडून निवडणुका लढायच्या आहेत. राज्यात मराठा, धनगर, ओबीसी असा आरक्षणाचा तिरंगी लढा सुरू आहे व जो तो आपापल्या पद्धतीने या आंदोलनातील सोंगट्या हलवीत आहे. पुन्हा निवडणुकांच्या तोंडावर सरकारच्या तिजोऱ्या (रिकाम्या असल्या तरी) कोणासाठी रिकाम्या होतील त्याचा नेम नाही. मात्र एवढा आटापिटा करूनही महाराष्ट्राची जनता विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविणार हे नक्की आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेत मोदी-शहांविरुद्ध टोकाची चीड आहे. स्वतः फडणवीस यांची पत कमालीची घसरली आहे. मुख्यमंत्री मिंधे हे दिल्लीतील त्यांच्या पातशहांना थेट थैल्या पोहोचवतात व या थैल्या फडणवीस वगैरे लोकांपेक्षा जास्त आहेत. मुंबई-महाराष्ट्राची लूट करून दिल्लीच्या पातशहांना खंडण्या ओतल्या जात आहेत व त्यात मऱ्हाठी जनतेचे अतोनात नुकसान आहे. हे सर्व मराठी जनता पाहत आहे. महाराष्ट्रात गद्दारांचे शासन आहे व मोदी-शहांनी हे बेकायदेशीर, बेइमान शासन महाराष्ट्राच्या छाताडावर बसवले. राज्यातील जनतेला हे मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत याच संतापाचे प्रतिबिंब दिसले. हरयाणातील निकालाची तुलना महाराष्ट्राशी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. पुन्हा महाराष्ट्रात श्रीमान उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासारखे लोकाभिमुख नेते व त्यांच्या फौजा जागरुक आहेत. हरयाणातील निवडणुकांत काँग्रेसची सर्व सूत्रे
एकाच व्यक्तीच्या हाती
होती. महाराष्ट्रात तसे चित्र आज तरी दिसत नाही. त्यामुळे हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात घडेल हे भाजप व त्यांच्या मिंध्यांचे स्वप्नरंजन म्हणायला हवे. महाराष्ट्रात आघाडीचे राजकारण आहे व ते भाजपास परवडणारे नाही. हरयाणात ‘ईव्हीएम’ मशीन घोटाळा झाला अशी तक्रार काँग्रेसतर्फे करण्यात आली. निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही यावर आता किती वेळा बोलायचे? हरयाणात मतमोजणीची सुरुवात झाली तेव्हा 72 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती. म्हणजे हा लोकमताचा कौल होता. पण हा कौल नंतर बदलला. राजस्थान, मध्य प्रदेश निवडणुकांतही सुरुवातीला लोकमताचा कौल भाजपविरोधी होता. काँग्रेसची घोडदौड सुरू असतानाच निकाल फिरले. ‘कौल’ इतक्या झपाट्याने कसे काय बदलू शकतात? महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मिंध्यांचे सूत्र असे दिसते की, जास्तीत जास्त ‘अपक्ष’ उभे करून जातीय मतविभागणी करायची. हरयाणात हा अपक्षांचा खेळ भाजपने नक्कीच केला आहे. महाराष्ट्रातही मतविभागणीचा ‘खेला’ करायचा व फाटाफूट घडवून निवडणुका जिंकायच्या हाच भाजप व त्यांच्या मिंध्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातही हरयाणाप्रमाणेच घडेल असे फडणवीस वगैरे लोक म्हणतात ते यासाठीच. पण मराठी माणूस मनाने लेचापेचा नाही. तो विचाराने पक्का आहे. हरयाणाच्या निकालाने जे निराश झाले त्यांनी जम्मू-कश्मीरच्या विजयाकडे आशेने पाहायला हवे. आम्ही हरयाणाप्रमाणे विजयी होऊ असे दावे करणाऱ्यांनी जम्मू-कश्मीरातील मोदी-शहांच्या पराभवाकडेही त्याच सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. भाजपच्या पिपाण्या कितीही वाजल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही!