पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती गुजरातमध्ये झाली आहे. तीन नराधमांनी मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीसोबत असणाऱ्या मित्राने घटनास्थळावरुन पळ काढला.
सदर घटना गुजरातमधील सुरतमध्ये घडली आहे. नवरात्रौत्सवाच्या दरम्यान ही घटना घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पीडित मुलगी ट्युशन संपवून मित्रांना भेटायला गेली होती. रात्री 10.30 च्या दरम्यान तिघांनी मिळून आईस्क्रिम खाल्ले. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या एका मित्रासोबत बोरसारा गावाजवळील हायवे शेजारील पेट्रोल पंपावर असणाऱ्या निर्जन रस्त्यावर बसली. दोघेही गप्पा मारत होते. मात्र तेवढ्यात तीन व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मित्र सोबत होता परंतु त्याने मुलीला वाचवायचे सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर त्या नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा मोबाईल घेऊन तिघेही फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या मित्राने स्थानिकांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर जाऊन शोधकार्या सुरू केले आहे. त्याचबरोबर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.