अजून लढाई संपलेली नाही, निवडणूक जिंकल्यानंतर विनेश फोगाटची पहिली प्रतिक्रिया

माजी कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा काँग्रेसच्या तिकीटावर हरयाणातून विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे. यावर फोगाट यांनी जुलान मतदारसंघाच्या मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच ही लढाई अजून संपलेली नाही असे सूचक विधानही फोगाट यांनी केले आहे.

एक्सवर पोस्ट करून फोगाट म्हणाल्या की, जुलाना आणि हरयाणा जनतेचे आभार. या न्यायाच्या कुस्तीत मला विजय मिळवून देणाऱ्यांचे आभार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ताकद दिली. हा फक्त माझा नाही तर तुम्हा सर्वांचा विजय आहे. जुलानाच्या प्रगतीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे मी आश्वासन देते.

पण अजूनही ही लढाई संपलेली नाही. जोपर्यंत सामान्य माणासाला न्याय मिळत नाही तोवर आपल्याला अजून मजबूत होऊन संघर्ष सुरू ठेवायचा आहे. हरयाणाच्या प्रत्येक नागरिकाने या कठिण मार्गावर एकजूट रहावे आणि आपल्या न्यायहक्कासाठी आवाज उठवावा असे माझे आवाहन आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून आपली ताकद आणि आपला निश्चय कायम ठेवला पाहिजे. माझ्या विजयासाठी तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रम, समर्पण आणि जी साथ दिली त्यासाठी मी सदैव आभारी राहिन असेही फोगाट यांनी नमूद केले आहे.