
नागपूरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आजोबा आणि नात खाली पडले. याचदरम्यान अंगावरून मिनी ट्रक गेल्याने सात वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकली आजोबांसोबत स्कूटरवरून जात असताना ही घटना घडली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूरमधील गोपाळ नगरच्या पाडोळे चौकात ही घटना घडली. मयत मुलगी आजोबांसोबत स्कूटरवरून डान्स क्लासला चालली होती. यादरम्यान पाडोळे चौकात अज्ञात वाहनाने स्कूटरला धडक दिली. यात आजोबा आणि सात वर्षाची मुलगी खाली पडले. याचदरम्यान मिनी ट्रक मुलीच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.