हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय राऊत

हरयाणाचा पराभव दुर्दैवी आहे. मात्र तिथल्या निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्व आहे. हरयाणात झालेल्या चुका इथे दुरुस्त होतील, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर रोखठोक प्रतिक्रिया दिली.

देशाच्या आणि भाजपच्या दृष्टीने जम्मू-कश्मीर महत्त्वाचे राज्य होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये क्रांती होईल, असे म्हणत भाजपने हा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. मात्र याचा प्रचार करूनही येथे मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा 90 आमदारांचीच आहे. एका ठिकाणी इंडिया आघाडी, तर दुसरीकडे भाजप विजयी झाली. अर्थात हरयाणाचा पराभव दुर्दैवी आहे. जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाला. हरयाणामध्येही इंडिया आघाडीची भट्टी जमली असती तर त्याचा निश्चितच परिणाम झाला असता, असे राऊत म्हणाले.

काँग्रेसला असे वाटले की हरयाणामध्ये आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कुणाचीही गरज नाही. जिथे काँग्रेसला वाटते आपण मजबूत आहे तिथे ते स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाही. त्याचा परिणाम हरयाणासारख्या निकालावर होतो. या पराभवातून अनेक गोष्टी शिकता येतील. देशातल्या निवडणुका इंडिया आघाडीला एकत्रच लढवाव्या लागतील. कुणीही स्वत:ला मोठा भाऊ, लहान भाऊ समजू नये. लोकसभेतील यश इंडिया आघाडीचे होते. हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही संजय राऊत ठामपणे म्हणाले.

हरयाणातील निकाल बदलला असता. तिथेही कांटे की टक्कर होऊ शकली असती. समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी यांच्या मतांचा काही टक्का आहे. या सगळ्यांशी चर्चा करून इंडिया आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेले असते तर निकालात बदल झाला असता. पण हरयाणाच्या निकालाचा एक फायदा झाला की महाराष्ट्रात आम्हाला दुरुस्ती करता येईल. हरयाणातल्या चुका महाराष्ट्रात होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

Haryana election result – भाजपने सत्ता राखली, पण सैनींच्या मंत्रीमंडळातील 8 मंत्र्यांनी पराभवाची चव चाखली

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमध्ये ओमर अब्दुल्ला हा चेहरा होता. लोकांनी ओमर अब्दुल्ला आणि इंडिया आघाडीला मतदान केले. हरयाणामध्येही असता चेहरा समोर आला असता तर कदाचित अजून काही बदल झाला असता. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकांना नेता हवा असतो. निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आणि मग नेता ठरवायचा हे धोरण लोकांच्या पचनी पडत नाही. माझा नेता कोण, माझे नेतृत्व कोण करणार आहे, या राज्याला चेहरा कोणता हे स्पष्ट केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.