जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीने विजय मिळवला, तर हरयाणात भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली. भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा विजय काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवला, तर भाजपचा एक उमेदवार काठावर पास झाला.
हरयाणामध्ये फिरोझपूर झिरका मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मामन खान यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवले. नूंह दंगलीमध्ये अटक झालेल्या मामन खान यांनी 98 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार नसीम अहमद यांचा पराभव केला. तर भाजप उमेदवार देवेंद्र अत्री यांनी सर्वात कमी मतांनी विजय मिळवला.
उचाना विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पहायला मिळाली. भाजपच्या देवेंद्र अत्री आणि काँग्रेसच्या बृजेश सिंह यांच्यात शेवटपर्यंत निकराची लढत झाली. यात अत्री यांनी बाजी मारली आणि ते अवघ्या 32 मतांनी विजयी झाले. अत्री यांना 42 हजार 835, तर सिंह यांना 42 हजार 803 मतं मिळाली.
मामन खान कोण आहेत?
फिरोझपूर झिरका मतदारसंघाचे नवनिर्वाचित काँग्रेस आमदार मामन खान यांच्यावर नूंह येथे हिंसाचार भडकवाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक फरकाने विजय मिळवला. त्यांना 1 लाख 30 हजार 497 मतं मिळाली, तर भाजपच्या नसीम अहमद यांना 32 हजार 56 मतं मिळाली.